पुणे शहरातील खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध गुटखा साठवणुकीवर जोरदार कारवाई करत ₹४,८७,२०४/- किमतीचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाला जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्तालयाच्या विशेष आदेशानुसार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून, आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.
घटनाक्रम:
दि. २५ जून २०२५ रोजी खडक पोलीस स्टेशनचे अधिकारी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार हर्षल दुडम यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, लोहियानगर, गल्ली नं. ०१, राम मंदिरजवळील ‘पठाण पान शॉप’ येथे अवैध गुटखा विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले.
या माहितीच्या आधारे सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे व पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे यांच्या पथकाने तत्काळ त्या दुकानावर छापा टाकला. छाप्यामध्ये दुकानात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याचा साठा आढळून आला.
जप्त मुद्देमाल:
प्रतिबंधित गुटखा व पान मसाला
एकूण किमतीचा मुद्देमाल – ₹४,८७,२०४/-
गुन्हा दाखल आणि आरोपीची चौकशी:
या कारवाईत रियाज नुर खान (वय ४०, रा. लोहियानगर) या गुटखा धारक आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याविरुद्ध IPC कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) तसेच FSSAI कायदा २००६ आणि Prohibition & Restriction on Sale Regulation 2011 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. सध्या न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे. चौकशीतून आरोपीने गुटखा कुठून आणला, कोणत्या वाहनातून आणला, कोणाला विक्री केली याची माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच हद्दीतील इतर गुटखा विक्रेत्यांची माहिती मिळवण्यासाठी तपास सुरु आहे.
मार्गदर्शक अधिकारी आणि तपास पथक:
ही उल्लेखनीय कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त (पश्चिम) श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ३ श्री. संभाजी कदम, मा. सहायक पोलीस आयुक्त खडकी विभाग श्रीमती अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शशीकांत चव्हाण, पो.नि. श्रीमती शर्मिला सुतार, पो.नि. मनोजकुमार लोंढे, सहा. पो.नि. अर्जुन कुदळे, पो.उ.नि. प्रल्हाद डोंगळे आणि पोलीस अंमलदार हर्षल दुडम, किरण ठवरे, अनिल फरांदे, अक्षय वाबळे, शुभम केदारी, मयूर काळे आदींनी केली आहे.
नागरिकांना आवाहन:
खडक पोलीस स्टेशनकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, अवैध गुटखा विक्रीबाबत कोणतीही माहिती असल्यास तत्काळ पोलिसांना कळवावी, जेणेकरून समाजविघातक कारवायांवर वेळेवर कारवाई करता येईल.