Home Breaking News पुणे व घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला! हवामान खात्याकडून ‘ऑरेंज अलर्ट

पुणे व घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला! हवामान खात्याकडून ‘ऑरेंज अलर्ट

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि घाटमाथ्याच्या भागांत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विशेषतः घाट विभागात पावसाचा जोर अधिक असून, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने घाट भागांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला असून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

घाटात मुसळधार पावसाचे संकेत

पावसामुळे वाहतूक, वीजपुरवठा आणि दरड कोसळण्याचा धोका वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. हवामान खात्याने सूचित केले आहे की, पावसाच्या प्रमाणात सातत्य राहणार असून दुपारी व संध्याकाळच्या वेळेस पावसाचा जोर अधिक असेल. विशेषतः खंडाळा, लोणावळा, भोर, वेल्हे, मुळशी भागांमध्ये पावसाची तीव्रता अधिक असणार आहे.

 पावसात विश्रांती घेताच तापमानात वाढ

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे तापमानात वाढ झालेली दिसून आली. शुक्रवारी (२७ जून) पुणे शहरात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. हवामान विभागाने नमूद केले की, पुढील तीन ते चार दिवस कमाल तापमान स्थिर राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता कायम आहे.

 शनिवार व रविवारचं हवामान

शनिवार (२८ जून) रोजी पुण्यातील कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस, किमान तापमान २३ अंश राहील. आकाशात अंशतः ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता आहे.

रविवार (२९ जून) रोजी तापमानात किंचित वाढ होऊन कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता असून, आकाश अंशतः ढगाळ राहून पावसाचे प्रमाण मध्यम स्वरूपाचे राहील.

 नागरीकांसाठी हवामान विभागाचे आवाहन

घाटात प्रवास करताना घसरणाऱ्या रस्त्यांपासून सावध राहावे.

शक्यतो अत्यावश्यक नसलेला प्रवास टाळावा.

वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन मोबाईल, टॉर्च इ. उपकरणे चार्ज ठेवावीत.

शाळा, कॉलेजकडून पालकांनी सतर्क राहावे.

 हवामानातील बदलामुळे आरोग्यावर परिणाम

अशा वातावरणात सर्दी, ताप, अंगदुखी, विषमज्वरासारखे त्रास जाणवण्याची शक्यता असल्याने डॉक्टरांनी पावसात भिजणे टाळण्याचे, उकळून थंड केलेले पाणी पिण्याचे आणि बाहेरील अन्न पदार्थ टाळण्याचे आवाहन केले आहे.