पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर लोणावळ्यात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढली आहे. या गर्दीचा गैरफायदा घेत काही फसवणूकखोर दुकानदारांची आर्थिक फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. बनावट यूपीआय पेमेंट स्क्रीनशॉट दाखवून अनेक दुकानदारांची दिशाभूल करून वस्तू घेण्याचे प्रकार वाढू लागले आहेत.
सतर्क दुकानदारामुळे टळली मोठी फसवणूक
कुमार चौकातील ‘वीके वाईन शॉप’ या दुकानात बुधवारी (दि. २५ जून) एक तरुण ग्राहक बनून आला आणि खरेदी करून खोटा UPI पेमेंटचा स्क्रीनशॉट दाखवला. मात्र दुकानदाराने चातुर्य दाखवत तत्काळ आपल्या खात्यात पैसे जमा झाले की नाही याची पडताळणी केली. पैसे न जमा झाल्याचे लक्षात येताच संबंधित व्यक्तीस ताब्यात घेतले आणि पोलीस हवालदाराच्या स्वाधीन केले.
फसवणूक करणाऱ्याने पोलिसांसमोर उघड केली बनावट स्क्रीनशॉट बनवण्याची पद्धत
पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर आरोपीने मोबाईलमध्ये बनावट पेमेंट स्क्रीनशॉट तयार करून दाखवला. यासाठी तो एक ॲप किंवा फोटो एडिटिंगचा वापर करत होता. त्याने अगोदर बनवलेले स्क्रीनशॉट इतर दुकानदारांना दाखवत खरेदी करून फसवणूक केली होती.
पोलिसांचा इशारा: प्रत्येक व्यवहार खात्री करूनच पार पाडा
लोणावळा पोलीस विभागाने नागरिक आणि दुकानदारांना आवाहन केले आहे की, UPI व्यवहारांची खात्री न झाल्यास वस्तू किंवा सेवा देऊ नये. गर्दीचा फायदा घेऊन बनावट व्यवहार करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
या घटनेनंतर लोणावळ्यातील अनेक दुकानदारांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी डिजिटल व्यवहारांमध्ये अधिक दक्षता बाळगण्याचे ठरवले आहे. काही दुकानांनी QR कोड स्कॅन केल्यानंतरच व्यवहार पूर्ण करण्याचा नियम लागू केला आहे.