वाहतुकीला मिळणार गती, जीवन होणार सुकर – अजित पवार पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील दोन महत्वाच्या मार्गांना केंद्र सरकारने अखेर मंजुरी दिली आहे. वनाज़ ते चांदणी चौक (मार्गिका २ अ) आणि रामवाडी ते वाघोली-विट्ठलवाडी (मार्गिका २ ब) या दोन्ही मार्गांच्या कामांवर आता लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होणार आहे.
पुण्याचा वेगाने वाढणारा शहरी विस्तार, वाढते वाहतूकभार, आणि पर्यावरणीय दृष्टीने मेट्रो सेवा गरजेची ठरत होती. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत (दि. २५ जून) यास मान्यता मिळाली. या निर्णयामुळे पुणेकरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकल्पाची वैशिष्ट्ये –
वनाज़ ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली-विट्ठलवाडी हे दोन्ही मार्ग पूर्णतः उन्नत मार्ग असतील.
एकत्रित लांबी : १२.७५ किमी
एकूण १३ स्थानके
एकूण अंदाजित खर्च : ₹३,६२६.७४ कोटी
चार वर्षांत प्रकल्प पूर्ण होण्याचे उद्दिष्ट
या मार्गांमुळे चांदणी चौक, कर्वेनगर, सिंहगड रस्ता, वाघोली उपनगरांतील प्रवास सुलभ होणार असून, वाहतूक कोंडीवर मोठा उतारा मिळणार आहे. यामुळे पुणे परिसरातील औद्योगिक, आर्थिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक वाढीस चालना मिळेल.
अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्रातील पुणे हे शहर विविध क्षेत्रांमध्ये झपाट्याने प्रगती करत आहे. मेट्रो सेवा वाढवून केवळ प्रवासच सुलभ होणार नाही, तर शहराचा समतोल आणि हरित विकास होईल.” आगामी काळात पुणे मेट्रो प्रकल्पाचे तीसरे टप्पेही अंतिम टप्प्यात असून, त्यासाठीही चर्चा सुरु आहे.