पिंपरी-चिंचवड | २१ जून २०२५ :- पिंपरी चिंचवडमधील चिंचवड गावातील शांतीबन सोसायटीमध्ये एका सुरक्षा रक्षकावर थरारक चाकू हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदाम कामिठे (वय अंदाजे ५०) असे जखमी सुरक्षा रक्षकाचे नाव असून, राम लोंढे नावाच्या इसमाने हा हल्ला केल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘कसा घुसतोस?’ विचारल्यावर संतापला, थेट चाकूने हल्ला
राम लोंढे नावाचा आरोपी शांतीबन सोसायटीमध्ये जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा तेथे कार्यरत सुरक्षा रक्षक सुदाम कामिठे यांनी त्याला थांबवून विचारणा केली – “कसा घुसतोस?” यामुळे संतप्त झालेल्या राम लोंढेने खिशातून चाकू काढत रागाच्या भरात कामिठे यांच्यावर सपासप वार केले.
सीसीटीव्हीमध्ये थरकाप उडवणारी दृश्ये
ही घटना सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, हल्लेखोराच्या अतिरेकी कृत्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
रुग्णालयात दाखल, आरोपीविरोधात गुन्हा दाखल
सुदाम कामिठे यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. पोलिसांनी राम लोंढे या आरोपीला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध हत्या करण्याचा प्रयत्न व गंभीर दुखापतीचे कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस तपास सुरू, पूर्वी सोसायटीतच होता सुरक्षा रक्षक
प्राथमिक चौकशीत राम लोंढे याला पूर्वी शांतीबन सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून कामावरून काढण्यात आले होते. त्या रागातूनच त्याने ही दहशत निर्माण करणारी कृती केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
ही घटना समजताच परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. सोसायटीतील सदस्यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याची मागणी केली आहे.