Home Breaking News पुणे रेल्वे स्थानकांवर तिकीट तपासणी मोहीम राबवली; एकाच दिवशी ५९४ प्रवासी पकडले,...

पुणे रेल्वे स्थानकांवर तिकीट तपासणी मोहीम राबवली; एकाच दिवशी ५९४ प्रवासी पकडले, ₹२.११ लाखांचा दंड वसूल

पुणे (दि. १७ जून २०२५): पुणे रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत एकाच दिवसात तब्बल ५९४ बिनतिकीट, अनियमित तिकीटधारक व परवानगीशिवाय सामान घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण ₹२,११,३८० इतका दंड वसूल करण्यात आला आहे.


ही मोहीम पुणे रेल्वे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अनिल कुमार पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली व विभागीय वाणिज्य व्यवस्थापक हेमंत कुमार बेहरा यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आली. हेमंत बेहरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईसाठी १ अधिकारी (डीसीएम), १ पर्यवेक्षक (सीटीआय, पुणे मुख्यालय), २८ तिकीट तपासणी कर्मचारी आणि १३ रेल्वे सुरक्षा दलाचे (RPF) जवान अशा मोठ्या संख्येने कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

या विशेष तपासणीसाठी १६ गाड्यांना प्रत्येकी ५ मिनिटांची विशेष थांबा देण्यात आला होता. त्यामध्ये ७ डाऊन आणि ९ अप गाड्यांचा समावेश होता. या वेळात सर्व डब्यांची कसून तपासणी करण्यात आली आणि नियमबाह्य प्रवाशांवर कठोर कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे या मोहिमेमुळे कोणत्याही गाडीच्या वेळापत्रकावर परिणाम झाला नाही.

रेल्वे प्रशासनाच्या या टप्प्याटप्प्याने राबवलेल्या कारवाईचे प्रवाशांनीही स्वागत केले असून, यामुळे रेल्वे प्रवास अधिक शिस्तबद्ध आणि सुरक्षित होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

रेल्वे प्रशासनाने अशा प्रकारच्या मोहिमा नियमितपणे राबवण्याचा निर्धार व्यक्त केला असून बिनतिकीट प्रवाशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर भूमिका घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.