पुणे :- पुणे शहरात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत एक मोठी आणि यशस्वी कारवाई अंमलात आणली आहे. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. २ ने एकूण १२,१२,३६० रुपये किंमतीचा सुमारे ५९.४०० ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा घातक अंमली पदार्थ जप्त करत एक व्यक्तीला अटक केली आहे. ही कारवाई फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवार पेठ, बाटा बोळ, लक्ष्मी रोड परिसरात पार पडली.
गोपनीय माहितीवरून अचूक कारवाई
दि. १४ जून रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक-२ चे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, महिला पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड आणि त्यांचा स्टाफ पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार सय्यद साहिल नजीर शेख यांना एका व्यक्तीकडून मोठ्या प्रमाणावर मॅफेड्रॉनची तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
त्यावरून पोलिसांनी बुधवार पेठ परिसरात सापळा रचून शरणप्पा नागाप्पा कटिमणी (वय ३४, रा. कात्रज, पुणे, मूळगाव: गुलबर्गा, कर्नाटक) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे ५९.४०० ग्रॅम मॅफेड्रॉन, रोकड रक्कम आणि इतर मुद्देमाल असा एकूण १२.१२ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
कायदेशीर कारवाई
या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ११८/२०२५ प्रमाणे, एन.डी.पी.एस. अॅक्टच्या कलम ८(क), २१(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मॅफेड्रॉन (एम.डी.) हा तरुण पिढीला लक्ष्य करणारा अत्यंत घातक आणि प्रतिबंधित अंमली पदार्थ असून, त्याची शहरात वाढणारी मागणी पाहता पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करत मोठा साठा रोखला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरात अंमली पदार्थांचे जाळे उध्वस्त करण्यासाठी पोलिसांकडून सातत्याने गुप्त माहितीच्या आधारे मोहीम राबवली जात आहे. “शहरात मादक पदार्थांचा सुळसुळाट खपवून घेणार नाही”, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
जनतेसाठी आवाहन
पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, अंमली पदार्थांची माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे, जेणेकरून अशा गंभीर प्रकारांना वेळीच आळा घालता येईल.