पुणे | १४ जून २०२५ – राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवली असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिवे घाट परिसरात ढगफुटीसदृश पावसामुळे प्रचंड पाणी साचून निसर्ग रौद्र रूपात अवतरला.
दिवे घाटात मुसळधार पावसामुळे ओढे, धबधबे आणि पाण्याचे प्रवाह एकदम ओसंडून वाहू लागले. काही धबधब्यांनी इतकं रौद्र रूप धारण केलं की घाटातून वाहणाऱ्या पाण्यामुळे वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. प्रवाशांना अडकून पडण्याची वेळ आली. स्थानिक प्रशासन व आपत्कालीन यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
दरम्यान, पिंपरी चिंचवडमध्ये जोरदार पावसामुळे काही वाहने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. विशेषतः चऱ्होलीतील ओढा अचानक भरून वाहू लागल्यामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या चार ते पाच गाड्या प्रवाहात वाहून गेल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन क्रेनच्या साह्याने वाहने बाहेर काढली.
पुणे शहरात पावसाचा फटका शासकीय इमारतींनाही बसला आहे. आयबी गेस्ट हाऊससारख्या महत्त्वाच्या इमारतीत सखल भागांमध्ये पाणी शिरल्यामुळे गेस्ट हाऊसमधील आमदार, माजी आमदार आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी यांची वास्तव्य व्यवस्था पूर्णतः विस्कळीत झाली. जिन्यांपर्यंत पाणी साचल्यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
सदर घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पावसामुळे स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे-पिंपरीमध्ये जलव्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
शहरात वाहतूक कोंडी, अनेक सखल भाग जलमय, झाडं उन्मळून पडणं, विद्युत पुरवठा खंडित होणं अशा घटना वारंवार घडत आहेत. हवामान विभागाने येत्या काही तासांत अधिक पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, ओढे-नाले ओलांडण्याचा प्रयत्न करू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड, दिवे घाट, घाटमाथा परिसरात प्रशासन युद्धपातळीवर कामाला लागले असून, मदतकार्य, जलनिकासी आणि वाहतूक नियंत्रणासाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.