Home Breaking News “महाराष्ट्रातील उत्कृष्ट तपास कार्याचा गौरव! ११ पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण...

“महाराष्ट्रातील उत्कृष्ट तपास कार्याचा गौरव! ११ पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक प्रदान”

172
0

पुणे (दि. १३ जून २०२५) – महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलातील उत्कृष्ट कार्यक्षमतेचा सन्मान करत ११ पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक प्रदान करण्यात आले. पोलीस संशोधन केंद्र, पुणे येथे आयोजित या भव्य समारंभात महाराष्ट्र राज्याच्या मा. पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.

या पुरस्कारासाठी निवडले गेलेले पोलीस अधिकारी यांनी खून, दरोडा, जबरी चोरी, अपहरण, बाललैंगिक शोषण, अंमली पदार्थविरोधी गुन्हे, फसवणूक आणि मानवी आरोग्यास धोका पोहोचवणारे गुन्हे तसेच पोक्सो अंतर्गत गुन्हे अतिशय कौशल्याने आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तपासले आहेत. त्यांच्या तपास कार्यामुळे गुन्हेगारांना कठोर शिक्षा होण्यास मदत झाली असून न्यायव्यवस्थेवर जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.

२०१८ ते २०२२ दरम्यान एकूण ५४ पोलीस अधिकाऱ्यांना हा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाला आहे. या निवडीसाठी राज्यस्तरावर एक विशेष समिती गठीत करण्यात आली होती, जी पोलीस महासंचालकांच्या मार्गदर्शनाखाली काम करते. समितीने सादर केलेल्या शिफारशींनुसार दरवर्षी राज्यातील ११ पोलीस अधिकाऱ्यांची निवड केंद्र सरकारकडून केली जाते.

या गौरव समारंभाला श्री. सुनील रामानंद (अपर पोलीस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग), श्री. अमितेश कुमार (पोलीस आयुक्त, पुणे शहर), श्री. विनयकुमार चौबे (पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड), डॉ. राजेंद्र डहाळे (विशेष पोलीस महानिरीक्षक), डॉ. बसवराज तेली (पोलीस उपमहानिरीक्षक), श्री. सौरभ अग्रवाल (पोलीस अधीक्षक, पुणे), श्रीमती पल्लवी बर्गे, श्री. पी. आर. पाटील, श्रीमती वैशाली माने आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

मा. पोलीस महासंचालक श्रीमती रश्मि शुक्ला यांनी पुरस्कारप्राप्त अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांचे कार्य अन्य पोलीस कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे म्हटले. त्यांनी अधिकाऱ्यांना आगामी काळातही अशाच कार्यतत्परतेने आणि निष्ठेने काम करण्याचे आवाहन केले.

या पुरस्कारामुळे महाराष्ट्र पोलीस दलाच्या गुन्हे उकल क्षमतेचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला असून तपास प्रक्रियेत पारदर्शकता व आधुनिकतेचा अवलंब करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.