Home Breaking News पुणे हडपसर पोलिसांची धडाडी! २९.७६ लाखांची सायबर फसवणूक रोखली; नागरिकांना मिळाले पैसे...

पुणे हडपसर पोलिसांची धडाडी! २९.७६ लाखांची सायबर फसवणूक रोखली; नागरिकांना मिळाले पैसे परत

214
0

पुणे | ११ जून २०२५ – पुणे शहरातील नागरिकांना सायबर चोरट्यांनी सोशल मिडिया अ‍ॅप्सच्या माध्यमातून फसवण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र, हडपसर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेने केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे तब्बल ₹२९,७६,८२२/- ची फसवणूक झालेली रक्कम तक्रारदारांच्या खात्यात परत जमा करण्यात यश मिळवलं आहे. या प्रकरणामुळे हडपसर पोलीस ठाण्याच्या सतर्कतेचं सर्वत्र कौतुक होत आहे.

काय आहे प्रकरण?

सायबर चोरट्यांनी नागरिकांशी संपर्क साधून, शेअर ट्रेडिंग, हॉटेल रेटिंग टास्क, फेड-एक्स कुरीयर, पीएम किसान अ‍ॅप लिंक, गॅस बिल भरणे, डिजिटल अटक यासारख्या माध्यमातून आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केली होती. काहींना अटक होईल, अशी भीती दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळण्यात आले.

धडाडीने पुढे आले हडपसर पोलिस!

हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय मोगले, गुन्हे विभागाचे निरीक्षक श्री. निलेश जगदाळे, तसेच सचिन गोरखे, तेजस पांडे, गायत्री पवार या पोलीस पथकाने सायबर गुन्हे झाल्यानंतर संबंधित बँक नोडल अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधून रक्कम गोठवण्यात यश मिळवलं. यानंतर मा. न्यायालयाच्या आदेशाने ही रक्कम तक्रारदारांच्या खात्यात परत जमा करण्यात आली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन ठरलं निर्णायक

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) श्री. मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ डॉ. राजकुमार शिंदे, सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग श्रीमती अनुराधा उदमले यांचे प्रभावी मार्गदर्शन आणि सततचा पाठपुरावा यामुळे शक्य झाली आहे.

सायबर सुरक्षेच्या दिशेने सकारात्मक पाऊल

हडपसर पोलिसांनी ही रक्कम परत मिळवून देऊन नागरिकांचा विश्वास जिंकला आहे. या प्रकरणातून “सायबर सुरक्षेबाबत नागरिकांनी जागरूक राहणे, कोणत्याही लिंकवर क्लिक न करणे, अज्ञात नंबरवर माहिती न देणे” याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

नागरिकांनी काय करावे?

अनोळखी लिंक किंवा कॉलवर विश्वास ठेवू नका.

आर्थिक माहिती शेअर करताना खबरदारी घ्या.

फसवणुकीचा संशय आल्यास त्वरित पोलिसांत तक्रार करा.

सायबर गुन्ह्यांविरोधात कठोर कारवाईसाठी पोलिसांना सहकार्य करा.