पुणे | ११ जून २०२५ – पुणे शहरातील नानापेठ येथे शिवम उदयकांत आंदेकर याने परवानगीशिवाय लावलेल्या लोखंडी फलकामुळे आणि त्यात बेकायदेशीररित्या वायरींग करून वीजपुरवठा घेतल्यामुळे घडलेली ८ वर्षीय चिमुरडीच्या मृत्यूची घटना सध्या शहरात संतापाचे आणि दुःखाचे वातावरण निर्माण करत आहे. फलकाच्या लोखंडी खांबाला विजेचा करंट उतरल्याने ही दुर्दैवी घटना घडली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
दिनांक १ जून २०२५ रोजी नानापेठमधील डोके तालीमजवळ खेळत असलेल्या एका ८ वर्षीय मुलीचा “स्व. उदयकांत आंदेकर चौक” या लोखंडी फलकाला हात लागल्यामुळे विजेचा जबरदस्त शॉक बसून जागीच मृत्यू झाला.
याच दरम्यान एका ११ वर्षीय मुलाने पीडित चिमुरडीला वाचवण्याचा प्रयत्न केला असता, त्यालाही विजेचा धक्का बसून तो गंभीर जखमी झाला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली.
पोलीस तपासात उघड झाले धक्कादायक वास्तव!
समर्थ पोलीस स्टेशनकडून केलेल्या तपासात शिवम आंदेकर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या वडिलांच्या नावाने “माजी लोकप्रिय नगरसेवक स्व. उदयकांत आंदेकर चौक” असा फलक अनधिकृतरीत्या बसवल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे, या फलकाला शेजारच्या फुटपाथवरील विजेच्या खांबातून परवानगीशिवाय वीजपुरवठा घेतल्याचे स्पष्ट झाले.
या निष्काळजीपणामुळेच फलकात करंट उतरून हा जीवघेणा अपघात घडला.
पोलीसांकडून दोन्ही गुन्ह्यांची नोंद
मृत्यू प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर १२४/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजेची चोरी आणि अनधिकृत फलक बसवल्याबद्दल गुन्हा रजिस्टर नंबर १२७/२०२५ अन्वये भारतीय विद्युत कायदा कलम १३५ अंतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास समर्थ पोलीस स्टेशन करत असून, संबंधित आरोपींवर कठोर कारवाई होणार आहे.
शहरात संतापाचा उद्रेक; महापालिकेवरही सवाल
या घटनेनंतर नानापेठ परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. महापालिका प्रशासनाकडून अशा अनधिकृत फलकांवर वेळेवर कारवाई का झाली नाही? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. अनेकांनी मागणी केली आहे की शहरातील सर्व अनधिकृत फलकांची तत्काळ छाननी करून कारवाई केली जावी.
मुलीच्या कुटुंबियांचे आक्रोशाने भरले वातावरण
पीडित चिमुरडीच्या पालकांनी अश्रूंच्या धारेत न्यायाची मागणी केली आहे. “एका निष्पाप जीवाची झोपडपट्टीतील निष्काळजीगिरीमुळे काढलेली किंमत कोण भरपाई देणार?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.