फरासखाना, पुणे | १० जून २०२५ :- पुण्यातील गणेश पेठ मच्छी मार्केटमधील एका मासे विक्रेत्याला तब्बल ९ वर्षांपासून जीवे मारण्याची धमकी देत दर महिन्याला ५० हजार रुपये खंडणी मागणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. फिर्यादीकडून सुमारे ४८ लाख रुपये ऑनलाईन व प्रत्यक्ष पद्धतीने वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, फरासखाना पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेने या प्रकरणात शिवम उदयकांत आंदेकर व आकाश सुरेश परदेशी यांना ताब्यात घेतले आहे.
घटनाक्रम आणि खंडणीचे स्वरूप: सन २०१६ पासून फिर्यादी गणेश पेठमधील सरकारी जागेवर मासेविक्री व्यवसाय करीत आहेत. त्यावेळी शिवम आंदेकर याने “तू इथे व्यवसाय करू शकत नाहीस, हप्ता द्यावा लागेल” असे म्हणत प्रत्यक्ष धमक्या दिल्या. त्याचे हस्तक आकाश परदेशी याच्या मार्फत महिन्याला ५०,००० रुपये खंडणी वसूल केली जात होती.
त्यामुळे एप्रिल २०२५ पर्यंत फिर्यादीकडून एकूण ४८ लाख रुपये खंडणी वसूल करण्यात आले. आर्थिक अडचणींमुळे हप्ता थांबविल्यावर मे २०२५ मध्ये दहशतीखाली गुंडांमार्फत दुकानातील ९०,००० रुपयांचे मासे बाहेर फेकले गेले, आणि ते सामान परत देण्यास नकार दिला गेला.
फिर्यादीची तक्रार आणि पोलिसांची तात्काळ कारवाई: फिर्यादीने पोलिसांकडे केलेल्या लेखी तक्रारीवर तात्काळ दखल घेण्यात आली. फरासखाना पोलीस ठाण्यात गु.र.नं. १०८/२०२५ अंतर्गत खंडणी, दरोडा, धमकी, गुन्हेगारी कट यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांनाही ताब्यात घेऊन कसून चौकशी करण्यात येत असून, आणखी आरोपींचा तपास सुरू आहे.
संपूर्ण ऑपरेशनमध्ये सहभाग असलेले अधिकारी: ▪️ मा. पोलीस आयुक्त अमितेश कुमार ▪️ सह आयुक्त रंजन शर्मा ▪️ अपर आयुक्त राजेश बनसोडे ▪️ पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे ▪️ सहाय्यक आयुक्त अनुजा देशमाने ▪️ वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे ▪️ निरीक्षक (गुन्हे) अजित जाधव ▪️ अ.पो.नि. वैभव गायकवाड ▪️ पो.उ.नि. अरविंद शिंदे ▪️ फरासखाना पोलिसांचे संपूर्ण तपास पथक
पोलीस प्रशासनाकडून इशारा: पुण्यात कोणताही व्यावसायिक गुन्हेगारी दबावाखाली खंडणी देत असेल तर त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. पुणे पोलिसांकडून अशा गुन्हेगारी प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्याचा निर्धार असून, कोणालाही दहशतीखाली व्यवसाय करू दिला जाणार नाही.