Home Breaking News पुणे – भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या गस्ती पथकाची वेळीच झालेली कारवाई; संभाव्य...

पुणे – भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या गस्ती पथकाची वेळीच झालेली कारवाई; संभाव्य गंभीर गुन्हा टळला

कात्रज कोंढवा रोड परिसरात गावठी कट्ट्याची हाताळणी करत असलेल्या दोघा संशयितांना भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या पथकाने जेरबंद केल्याची महत्त्वपूर्ण कारवाई समोर आली आहे. या दोघांकडून गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे असा एकूण ₹३१,००० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, यामुळे संभाव्य मोठा गुन्हा टळल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दिनांक ५ जून २०२५ रोजी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर शेंडे हे आपल्या पोलीस पथकासह हद्दीत गस्त घालत होते. त्याचवेळी त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कात्रज कोंढवा रोडवरील कपिलामृत डेअरीजवळील मोकळ्या मैदानाजवळ तीन इसम गावठी कट्ट्यासह आढळून आले आहेत.
या माहितीवर तात्काळ कारवाई करत सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर शेंडे यांनी अंमलदार सौरभ वायदंडे, संग्राम पवार, सागर कोंडे आणि केतन लोंखडे यांच्यासह घटनास्थळी धाव घेतली. तेथे दोन तरुण संशयित हातात गावठी कट्टा घेऊन थांबले असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांना वेळीच ताब्यात घेतल्यामुळे कोणताही गंभीर प्रकार घडण्याआधीच तो टाळण्यात यश आले.
जेरबंद आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
१. शुभम प्रमोद माने, वय २६, रा. शिवशंभूनगर, कात्रज कोंढवा रोड, पुणे
२. गणेश बाबासाहेब लंके, वय २७, रा. ओम निवास, महादेवनगर, शेलार मळा, कात्रज कोंढवा रोड, पुणे
दोघांवर भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं. २७८/२०२५ अन्वये भारतीय हत्यार अधिनियम ३ सह २५, महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१)(३) सह १३५, आणि भा.दं.वि. कलम ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कामगिरीत अपर पोलीस आयुक्त श्री. राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त श्रीमती स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. राहुल आवारे, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुल खिलारे, व इतर पोलीस पथकाचा मोलाचा सहभाग होता.
पोलिसांनी वेळेवर हालचाल करून शहरात होऊ शकणारा मोठा गुन्हा टाळला आहे. पुणे शहरात असल्या स्वरूपातील गैरप्रकारांवर लक्ष ठेवून अशा गुन्हेगारी प्रवृत्तींचा बंदोबस्त करण्यात येईल, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.