Home Breaking News कोंढव्यात परकीय नागरिकाची माहिती लपविणाऱ्यांविरुद्ध गुन्हा! रियल इस्टेट एजंट व घरमालकावर पोलिसांची...

कोंढव्यात परकीय नागरिकाची माहिती लपविणाऱ्यांविरुद्ध गुन्हा! रियल इस्टेट एजंट व घरमालकावर पोलिसांची कारवाई

118
0

पुणे | ६ जून २०२५ – पुणे शहरातील कोंढवा परिसरात परकीय नागरिकांच्या अनधिकृत वास्तव्याचा पर्दाफाश करत कोंढवा पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. परकीय नागरिकांची माहिती पोलीस ठाण्यात न देता, बेकायदेशीर पद्धतीने भाड्याने घर दिल्याप्रकरणी संबंधित घरमालक आणि रिअल इस्टेट एजंट अदनान शबीर हुसेन बोहरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

कोंढवा पोलिसांना पोलीस आयुक्त कार्यालयाच्या परकीय नागरिक विभागाकडून माहिती मिळाली होती की, शिवकृपा बिल्डिंग, कोंढवा खुर्द, अजमेरा हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या फ्लॅटमध्ये एक महिला परदेशी नागरिक वास्तव्य करत आहे, आणि त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती स्थानिक पोलीस ठाण्यास देण्यात आलेली नाही.

तपासादरम्यान पोलिसांनी फ्लॅटची तपासणी केली असता, घरमालक आणि एजंटने भाडेकरूबाबत कोणतेही पोलीस व्हेरिफिकेशन किंवा भाडेकरार न करता ती परकीय महिला फ्लॅटमध्ये ठेवली असल्याचे निष्पन्न झाले. यामुळे सुरक्षा नियमांचे स्पष्ट उल्लंघन झाले आहे.

 कोणते कायदे झाले लागू?

सदर प्रकरणात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ आणि ३(५) तसेच भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३(३) नुसार कडक कारवाई करण्यात आली आहे. याअंतर्गत पोलिसांनी गु.र.नं. ४२९/२०२५ अन्वये गुन्हा नोंदवला.

 पोलिसांचा स्पष्ट इशारा:

पोलिसांनी सांगितले की, पुणे शहरात परकीय व्यक्तींना राहण्यासाठी जागा देताना मालकांनी व एजंटांनी पोलीसांना माहिती देणे बंधनकारक आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई केली जाईल. शहराच्या सुरक्षिततेसाठी हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

 मार्गदर्शनाखाली झाली कारवाई:

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अब्दुल रऊफ शेख व नवनाथ जगताप यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार किटे, सुतार, हुसेन शेख, सावंत, मोरे यांनी केली.

 नागरिकांसाठी महत्वाचा इशारा:

“भाडेकरू परकीय नागरिक असो वा भारतीय – पोलीस व्हेरिफिकेशन आवश्यकच आहे!”
नियमांचे उल्लंघन केल्यास मालक आणि एजंट दोघांनाही कारवाईला सामोरे जावे लागेल.