मुंबई | प्रतिनिधी :- राज्याला हरित व समृद्ध बनवण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल उचलत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र’ या अभियानासाठी १० कोटी वृक्षलागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट जाहीर करण्यात आलं आहे. मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहात पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आगामी वर्षीही तितक्याच झाडांची लागवड करण्याचा मानस असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
वृक्षारोपण ही लोकचळवळ होण्यासाठी आवाहन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “पर्यावरण संतुलनासाठी वृक्षलागवड अनिवार्य आहे. ही केवळ सरकारी योजना नसून, ती लोकचळवळ व्हावी यासाठी समाजाच्या सर्व घटकांनी पुढे यावं. शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदा, महापालिका, शाळा, कॉलेजेस, सामाजिक संस्था आणि जनतेने सामूहिकपणे सहभागी व्हावे.”
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून झाडांचे जतन मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं की, लावलेली झाडं टिकावीत, यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रिमोट सेन्सिंग आणि उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक आणि शाश्वत कामकाज होईल. झाडांची वाढ योग्य व टिकाऊ होण्यासाठी रोपांची वय किमान दीड ते तीन वर्ष असावी, असेही ते म्हणाले.
कॅम्पा निधीचा प्रभावी वापर आणि विशेष भागांवर लक्ष वृक्षलागवडीसाठी ‘कॅम्पा निधी’ वापरण्याचे निर्देश देण्यात आले. याशिवाय, गडचिरोली जिल्ह्यात उद्योगवाढीच्या पार्श्वभूमीवर १ कोटी वृक्षांची विशेष लागवड केली जाणार आहे. बीड, लातूरसारख्या मराठवाड्यातील कोरडवाहू जिल्ह्यांत झाडांची संख्या अत्यंत कमी असल्यामुळे तिथे विशेष वृक्षारोपण मोहीम राबवली जाणार आहे.
प्रमुख मार्गांवर वृक्षलागवडीचा प्रारंभ राष्ट्रीय व राज्य महामार्ग, तसेच पालखी मार्गांलगत मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीचा कार्यक्रम वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली राबवला जाणार आहे. प्रसिद्ध जोतिबाच्या डोंगरावरही वृक्षलागवडीसाठी मोठी योजना तयार करण्यात आली आहे.
‘एक पेड माँ के नाम’ मोहिमेला महाराष्ट्रचा मोठा प्रतिसाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘एक पेड माँ के नाम’ या अभियानात महाराष्ट्राने गतवर्षीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ८ वर्षात ३३ कोटी व ५० कोटी वृक्षलागवड यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे राज्य पुन्हा एकदा देशात पर्यावरणपूरक उदाहरण निर्माण करत आहे.
बैठकीत उच्चस्तरीय उपस्थिती या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गणेश नाईक, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सर्वांनी आपल्या विभागस्तरावर या अभियानास गती देण्याचे आश्वासन दिले.