मुंबई | प्रतिनिधी :- महाराष्ट्राच्या बहुप्रतिक्षित आणि ऐतिहासिक समृद्धी महामार्गाचे अखेरचे आणि सर्वात जास्त तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक असलेले 76 किमीचे इगतपुरी ते अमाणे (ठाणे) हे अंतर आज, 5 जून 2025 रोजी औपचारिकरित्या वाहतुकीसाठी खुले करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.
या उद्घाटनामुळे 701 किलोमीटर लांब असलेला संपूर्ण मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग पूर्णत्वास गेला असून, आता या दोन प्रमुख शहरांमधील प्रवास वेळ 16 तासांवरून थेट 8 तासांवर येणार आहे.
इगतपुरी-ठाणे टप्प्याचे वैशिष्ट्य हा टप्पा विशेषतः अवघड भूप्रदेश, प्रचंड पर्जन्यमान, दाट जंगल आणि डोंगराळ भाग यामुळे सर्वांत कठीण मानला जात होता. इगतपुरी हा महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचा भाग असल्यामुळे कामादरम्यान अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मात्र, आधुनिक अभियांत्रिकी पद्धती, सुरक्षा तंत्रज्ञान आणि समर्पित कामगिरीच्या जोरावर हा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला.
7.78 किमी लांबीची भारतातील सर्वात रुंद आणि महाराष्ट्रातील सर्वात लांब रोड टनेल या टप्प्यातील पिंप्री साद्रोद्दीन (नाशिक) ते वशाळा बुद्रुक (ठाणे) या 13.1 किमी अंतरामध्ये दोन भुयारी बोगदे, दोन उड्डाणपूल, टोल नाके, इंटरचेंज, क्रॉस पासेज आणि जलनिकासीसाठी बॉक्स कल्व्हर्ट्स यांचा समावेश आहे. या बोगद्यांमध्ये New Austrian Tunnelling Method (NATM) चा वापर करून केवळ दोन वर्षांत बांधकाम पूर्ण करण्यात आलं. विशेष म्हणजे, हे भारतातील पहिले हाय प्रेशर वॉटर मिस्ट फायर सेफ्टी सिस्टिम असलेले टनेल आहे.
दुर्घटनाप्रवण कसारा घाट टाळून सरळ मार्ग या टनेलची S-curve रचना आणि 2.49% उतार या वैशिष्ट्यांमुळे कसारा घाटातील कठीण आणि अपघातप्रवण वळणं टाळली आहेत. त्यामुळे वाहनचालकांना सरळ, गतीशील आणि सुरक्षित प्रवास अनुभवता येणार आहे.
प्रशासनाची वाहतूक सुलभीकरणाची तयारी समृद्धी महामार्ग पूर्णत्वास गेल्यानंतर ठाणेजवळ मोठी वाहतूक वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता, MSRDC कडून जुन्या मुंबई-नाशिक महामार्गाचे रुंदीकरणही हाती घेण्यात आले आहे. यामुळे ठाणेजवळ संभाव्य वाहतूक कोंडी टळणार आहे.
राज्याच्या विकासाला नवे पंख या महामार्गाच्या पूर्णत्वामुळे राज्यातील औद्योगिक गुंतवणूक, वाहतूक, लॉजिस्टिक क्षेत्र, शेती आणि पर्यटन यासारख्या विविध क्षेत्रांना गती मिळणार आहे. नागपूर, औरंगाबाद, जळगाव, नाशिक, ठाणे आणि मुंबई या शहरांना एकत्र जोडणाऱ्या या महामार्गामुळे महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने ‘समृद्धी’ची सुरुवात होणार आहे.