Home Breaking News 294 मिमी सरासरी पावसामुळे घरे, पूल, रस्ते, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान; पंचनामे...

294 मिमी सरासरी पावसामुळे घरे, पूल, रस्ते, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान; पंचनामे पूर्ण करून तात्काळ भरपाईचे प्रस्ताव सादर करा – शंभूराज देसाई यांचे निर्देश

सातारा | मे महिन्यात सातारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून 20 ते 28 मे या कालावधीत तब्बल 294.1 मिमी सरासरी पर्ज्यन्यमान नोंदले गेले. ही टक्केवारी सर्वसाधारण 880% पेक्षा अधिक आहे. विशेषतः माण, खटाव, फलटण या तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे घरे, रस्ते, पूल, पिके आणि जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

या पार्श्वभूमीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. त्यांनी सर्व संबंधित यंत्रणांना निर्देश दिले की, नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करून तात्काळ भरपाईसाठीचे आराखडे शासनास सादर करावेत.


घरांचे आणि जनावरांचे नुकसान:

282 बाधित गावांमध्ये 38 घरे पूर्णतः पडली (माण-27, फलटण-10, महाबळेश्वर-1)

1,826 घरे अंशतः पडली

16 गोठे बाधित

18 लहान, 22 दुधाळ जनावरे आणि 3 ओढकाम करणारी जनावरे मृत

150 कोंबड्याही मरण पावल्या

 शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान:

6,190 शेतकऱ्यांचे 1,860 हेक्टर बागायती क्षेत्र बाधित

17 शेतकऱ्यांचे 8 हेक्टरहून अधिक फळपिकांचे नुकसान

 जीवितहानी:

माणमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू

खटावमध्ये विद्युत शॉकमुळे एकाचा मृत्यू

पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले की, “ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे त्यांनाही शासन नियमानुसार भरपाई दिली जाईल. तसेच जमिनी खरडून निघालेल्या भागांसाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करावेत.”

तसेच, गावातून वाडीवस्तीला जाणारे रस्ते आणि पूल नुकसानग्रस्त झाले असून, त्यांच्या दुरुस्तीचे प्रस्तावही तात्काळ सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरडी कोसळण्याच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जेसीबी, पोकलॅन सारखी यंत्रणा तयार ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले.

 तालुकानिहाय पावसाची आकडेवारी (20 ते 28 मे):

फलटण: 367.3 मिमी

जावळी: 340.4 मिमी

कोरेगाव: 338.4 मिमी

सातारा: 305 मिमी

महाबळेश्वर: 297.6 मिमी

खटाव: 292.9 मिमी

पाटण: 286.9 मिमी

वाई: 279.6 मिमी

माण: 270.8 मिमी

खंडाळा: 257.1 मिमी

कराड: 246.9 मिमी

या पावसामुळे सातारा जिल्ह्यातील प्रशासनाची कसोटी लागली असून आता सर्वांच्या नजरा भरपाईच्या निर्णयाकडे लागल्या आहेत.