Home Breaking News पुणे पोलिस दलाला नवे बळ! परिमंडळ ५ मधील पोलीस ठाण्यांना अमनोरा ग्रुपकडून...

पुणे पोलिस दलाला नवे बळ! परिमंडळ ५ मधील पोलीस ठाण्यांना अमनोरा ग्रुपकडून नवी वाहने सुपूर्त

104
0

पुणे शहराच्या सुरक्षिततेसाठी झटणाऱ्या पोलीस दलासाठी आणखी एक आनंदाची बातमी. सिटी कार्पोरेशन लिमिटेड (अमनोरा) यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) उपक्रमांतर्गत पुणे पोलिसांना ९ नव्या चारचाकी वाहनांचे योगदान मिळाले असून, या वाहनांचे वितरण परिमंडळ ५ अंतर्गत कार्यरत पोलीस ठाण्यांना करण्यात आले आहे.

ही सुपूर्त दिनांक २८ मे २०२५ रोजी एका विशेष समारंभात करण्यात आली. अमनोरा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक श्री. अनिरुद्ध देशपांडे यांनी ही वाहने पुणे शहराचे मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्याकडे अधिकृतरित्या सुपूर्त केली. या उपक्रमामुळे शहरातील गस्त आणि पोलिसांची प्रतिसादक्षमता निश्चितच वाढणार आहे.

पुणे पोलीस दलात सध्या ५१४ चारचाकी आणि ४४५ दुचाकी वाहने कार्यरत आहेत. शहराच्या संरक्षणासाठी ३९ पोलीस ठाण्यांमध्ये २४x७ गस्त घालणाऱ्या सीआर मोबाईल व बीट मार्शल यंत्रणा कार्यरत आहे. मात्र, नव्याने स्थापन झालेली ७ पोलीस ठाणे, वाढती लोकसंख्या आणि गुन्ह्यांचे आधुनिक स्वरूप लक्षात घेता, पोलिस दलास अत्याधुनिक व पुरेशा वाहनांची नितांत गरज भासत होती.

यापूर्वी पोलिसांकडील ६७० जुन्या वाहनांचे निकामीकरण करून लिलाव करण्यात आला होता. त्यामुळे नवीन वाहने उपलब्ध करून देण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. अशा स्थितीत अमनोरा ग्रुपकडून मिळालेले हे CSR वाहनदान हे निश्चितच पुणे पोलिसांसाठी दिलासा देणारे ठरणार आहे.

या वाहनांचा उपयोग पुढील कार्यासाठी केला जाणार आहे:

  • पेट्रोलिंग

  • बीट मार्शल सेवा

  • व्हीव्हीआयपी पायलट एस्कॉर्ट

  • गुन्हेगारांना न्यायालयात ने-आण

  • विविध गुन्ह्यांच्या तपासासाठी जिल्हा व राज्याबाहेरील दौरे

या उपक्रमामुळे पुणे शहरातील कायदा-सुव्यवस्थेच्या बळकटीकरणाला अधिक गती मिळणार आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल सदैव सज्ज राहील याची खात्री या वाहनाद्वारे अधिक बळकट होईल.