Home Breaking News वैष्णवी आत्महत्या प्रकरणात खळबळजनक वकिलांचा युक्तिवाद; रोहिणी खडसे यांची संतप्त प्रतिक्रिया –...

वैष्णवी आत्महत्या प्रकरणात खळबळजनक वकिलांचा युक्तिवाद; रोहिणी खडसे यांची संतप्त प्रतिक्रिया – “त्या वकिलाला कानाखाली मारणाऱ्याचा मी सत्कार करीन!”

प्रतिनिधी | मुंबई | हगवणे प्रकरणात मृत वैष्णवी हिच्या चारित्र्यावरच संशय घेणारा आणि आरोपीची बाजू सावरणारा युक्तिवाद काल न्यायालयात करण्यात आला. या युक्तिवादामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून, महिला नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

कोर्टात आरोपी पक्षाच्या वकिलांकडून अजब तर्क

वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येप्रकरणात आरोपी असलेल्या तिच्या पतीसह कुटुंबियांच्या बाजूने बोलताना वकिलांनी चक्क मृत वैष्णवीच्या चारित्र्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत “नवऱ्याने कानाखाली मारणं छळ ठरतं का?”, “प्लास्टिकची छडी हत्यार असते का?” असे शर्मास्पद तर्क मांडले. या युक्तिवादानंतर महिला संघटनांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध व्यक्त केला आहे.

चित्रा वाघ यांचा संतप्त संताप – “हरामखोरांनो… माणसं नाहीत तुम्ही!”

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “पोरीला हालहाल करून मारलं तरी अजून मन नाही भरलं तर मारल्यानंतरही तिच्या चारित्र्यावर बोलतां… अरे हरामखोरांनो, लांडग्याच्या पुढची औलाद आहे रे तुमची… माणसं नाहीचं तुम्ही!” त्यांच्या या वक्तव्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

रोहिणी खडसे यांचा थेट इशारा – “त्या वकिलाला कानाखाली मारणाऱ्याचा सत्कार करीन”

राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी या युक्तिवादावर तीव्र प्रतिक्रिया देताना एक धक्कादायक विधान केलं आहे. “वैष्णवीप्रकरणात अजब युक्तिवाद करणाऱ्या त्या वकिलाच्या जो कोणी कानाखाली मारेल, त्याचा मी जाहीर सत्कार करणार!”

या विधानामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. समाज माध्यमांवर खडसेंच्या या विधानाला अनेकांनी पाठिंबा दिला आहे, तर काहींनी ते गैरसोयीचं आणि न्यायप्रक्रियेत हस्तक्षेप करणारे म्हणून टीकाही केली आहे.

महिलांच्या न्यायासाठी लढणाऱ्या नेत्यांची एकजूट

या प्रकरणाने महिला अत्याचार, हुंडा, मानसिक छळ या मुद्यांवर पुन्हा एकदा समाजात तीव्र चर्चा निर्माण केली आहे. विविध महिला नेत्यांनी वैष्णवीच्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत.

पोलिस आणि न्यायालयांवर दबाव वाढतोय

या प्रकरणाच निष्पक्ष आणि जलद चौकशी होऊन दोषींना कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी आता जनतेकडूनही होऊ लागली आहे. मृत व्यक्तीचा अपमान करणाऱ्या युक्तिवादाची उच्च न्यायालयाकडून दखल घेतली जावी, अशी मागणी आता सोशल मीडियावर जोर धरू लागली आहे.