प्रतिनिधी | पुणे | वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतलं आहे. हगवणे कुटुंबाने न्यायालयात पाच कोटींच्या गाड्यांचा दावा करत आपल्यावरील आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला. मात्र वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी हगवणेंच्या प्रत्येक दाव्याची जोरदार खरमरीत चिरफाड केली आहे.
“माझ्याशी वाद घालून म्हणाला – एमजे हेक्टर गाडी पेटवून देईन”
वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले की, “मी एमजे हेक्टर गाडी बुक केली होती. पण शशांक हगवणे मला म्हणाला – ‘ही गाडी दिलीस तर मी तिथेच पेटवून देईन, मला फक्त फॉर्च्युनरच पाहिजे!’” त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रकरणाची गंभीरता अधिकच वाढली आहे.
फॉर्च्युनर मिळाल्यावरच लग्न – जबरदस्तीचा आरोप
कस्पटे यांनी पुढे खुलासा केला की, “शशांक आणि त्याच्या कुटुंबीयांनी फॉर्च्युनर, सोनं आणि चांदीची मागणी केली होती. दोन लग्न आधीच मोडली होती, त्यामुळे हा विवाह मी जबरदस्तीने मान्य केला.” हुंड्यासाठी केलेल्या मागण्यांचा दाखलासहीत उल्लेख त्यांनी केला आहे.
‘पाच कोटींच्या गाड्या’ म्हणणाऱ्यांकडे एकच गाडीही नाही – अनिल कस्पटे यांचा दावा
हगवणे कुटुंबाने कोर्टात “आमच्याकडे ५ कोटींच्या गाड्या आहेत, आम्हाला गाडीची गरजच नव्हती” असं म्हटलं. मात्र अनिल कस्पटे यांनी उघडपणे सांगितलं की, “त्यांच्याकडे एकही गाडी नाही. एकमेव फोर्ड गाडी आहे, ती सुद्धा चंद्रकांत बुचडे नावाच्या इसमाच्या नावावर आहे. ती सध्या पोलिस स्टेशनमध्ये आहे.”
पावतीसह पुरावे
“मी एमजे हेक्टर गाडी बुक करताना ५०,००० रुपये डिपॉझिट दिलं होतं. त्याची पावती आजही माझ्याकडे आहे,” असंही कस्पटे यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या पुराव्यांनी हगवणे कुटुंबाच्या युक्तिवादाला मोठा धक्का बसला आहे.
“आम्ही छळ केला नाही” – पण मागणी मात्र होती!
हगवणे कुटुंब एकीकडे स्वतःवर छळाचा आरोप फेटाळत आहेत, तर दुसरीकडे पाच कोटींच्या गाड्यांचा हवाला देत वैष्णवीच्या मानसिक छळाचा बेखौफ खुलासा स्वतःहूनच करत आहेत.
जनतेत संताप – आरोपींना कठोर शिक्षा द्या!
या प्रकारानंतर जनतेमध्ये संतापाचं वातावरण आहे. अनेक महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी केली आहे.
या प्रकरणातील मुख्य मुद्दे –
-
शशांक हगवणे यांचा धमकीचा आरोप – “एमजे हेक्टर गाडी पेटवून देईन”
-
जबरदस्तीने लग्नासाठी फॉर्च्युनरची मागणी
-
हगवणेंकडून चुकीचे मालमत्तेचे दावे – प्रत्यक्षात पुरावे नसल्याचा आरोप
-
हुंड्यासाठी सोनं, चांदी आणि गाडीची मागणी असल्याचं अनिल कस्पटे यांचे म्हणणे





