पुणे: वैष्णवी हगवणे हत्या प्रकरण पुन्हा एकदा चांगलंच गाजू लागलं आहे. या प्रकरणातील आरोपींच्या बाजूने न्यायालयात मांडण्यात आलेल्या अजब वकिली युक्तीवादामुळे वातावरण पुन्हा पेटलं आहे. या युक्तीवादावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आपल्या रोखठोक शैलीत संताप व्यक्त केला आहे.
चित्रा वाघ यांनी थेट ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं आहे की, “पोरीला हालहाल करून मारून टाकलंत… अजून मन नाही भरलं तर आता तिच्या चारित्र्यावरही बोलताय? अरे हरामखोरांनो, लांडग्याच्या पुढची औलाद आहे रे तुमची… माणसं नाहीचं तुम्ही!” अशा शब्दांत त्यांनी आरोपी आणि त्यांच्या वकिलांवर कठोर शब्दांत टीका केली आहे.
वाघ यांनी हा मुद्दा इथेच न थांबवता, पुढे असेही म्हटलं की, “खवीसाला कसे खवीस मिळतात, तसंच हे आरोपी आणि त्यांची बाजू मांडणारे आहेत. हे वकिल काय सिद्ध करू पाहत आहेत? पाईपाने मारमार मारलं, शरीरावर कुठलाही भाग असा नव्हता जिथे व्रण नव्हते आणि आता युक्तीवाद करून काय साध्य करणार?”
त्यांनी पुणे पोलिसांना उद्देशून म्हटलं, “एकेक पुरावा गोळा करा… वैष्णवीचे हे हरामखोर मारेकरी जिवंत असतानाच फासावर लटकायला हवेत!”
या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी समाजातील अनेक महिला संघटना, विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते आता आवाज उठवत आहेत. सोशल मीडियावरूनही लोकांचा संताप व्यक्त होतोय.
हगवणे कुटुंबावर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या वकिलांवर टीका करताना वाघ यांनी न्यायालयीन प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘न्यायव्यवस्थेचा गैरवापर करून आरोपींचा बचाव करणं म्हणजे पीडितेला पुन्हा एकदा मारणं नाही का?’ असा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांमध्येही निर्माण होतो आहे.
पोलिसांच्या तपासात आरोपींनी वैष्णवीवर अमानुष अत्याचार केल्याचे अनेक पुरावे समोर आले असून, तिच्या मृत्यूच्या आधी तिला प्रचंड मारहाण करण्यात आली होती. तरीही आरोपींचे समर्थन करणारे वकिल अशा प्रकारचे युक्तीवाद सादर करत असल्याने या प्रकरणातील न्यायप्रक्रियेवर समाजातून प्रचंड संताप व्यक्त केला जातोय.