Home Breaking News आंबेगाव पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचे भव्य उद्घाटन – पुणे पोलीस आयुक्त अमितेश...

आंबेगाव पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचे भव्य उद्घाटन – पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते फीत कापून लोकार्पण

237
0

पुणे – पुणे शहराच्या पोलिस यंत्रणेत एक नवीन अध्याय आजपासून सुरू झाला आहे. आंबेगाव परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणारी आंबेगाव पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचे उद्घाटन पोलीस आयुक्त मा. अमितेश कुमार यांच्या हस्ते थाटात पार पडले. या सोहळ्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

आंबेगाव पोलीस स्टेशनची सुरुवात दिनांक ११ ऑक्टोबर २०२४ रोजी झाली होती. सुरुवातीला केवळ दोन खोल्यांमध्ये पोलीस ठाण्याचे कामकाज सुरू होते. मर्यादित जागेचा अडथळा असूनही पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय चोख सेवा बजावली. मात्र वाढत्या लोकवस्तीमुळे आणि गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर एक सुसज्ज, स्वतंत्र इमारत उभारण्याची गरज होती. या गरजेची पूर्तता आता झाली असून, नव्याने बांधलेल्या भव्य पोलीस ठाण्यात अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या नव्या इमारतीचे बांधकाम वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. आजच्या उद्घाटन प्रसंगी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी फीत कापून आणि कोनशीला अनावरण करून नूतन इमारतीचे अधिकृत उद्घाटन केले.

उद्घाटन सोहळ्यास सहाय्यक पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, उप पोलीस आयुक्त स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे, आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक गजानन चोरमले, तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त प्रियांका गोरे आणि अनेक मान्यवर अधिकाऱ्यांसह पोलीस अंमलदार उपस्थित होते.

या नव्या इमारतीत नागरिकांसाठी सुयोग्य तक्रार नोंदणी विभाग, महिलांसाठी स्वतंत्र कक्ष, तांत्रिक सहाय्य प्रणाली, सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, आणि अधिकारी-अंमलदारांसाठी आरामदायक कार्यालयीन व्यवस्था करण्यात आली आहे. हे पोलीस ठाणे आता अधिक गतिशील आणि जनसामान्यांना तत्पर सेवा देण्यास सक्षम ठरणार आहे.

नवीन पोलीस स्टेशनमुळे आंबेगाव परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास मोठी मदत होणार असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेत वाढ होणार आहे. नागरिक आणि पोलिसांमधील विश्वास वृद्धिंगत होऊन ‘सर्वांसाठी सुरक्षित शहर’ या संकल्पनेला बळकटी मिळणार आहे.