Home Breaking News स्वारगेटमध्ये महिला चोरट्या जेरबंद – ₹२.७० लाखांचे दागिने जप्त; ३ गुन्ह्यांचा उलगडा!

स्वारगेटमध्ये महिला चोरट्या जेरबंद – ₹२.७० लाखांचे दागिने जप्त; ३ गुन्ह्यांचा उलगडा!

पुणे – पुणे शहराच्या मध्यवर्ती स्वारगेट परिसरात गर्दीचा फायदा घेत महिलांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका सराईत महिला चोरट्याला अखेर स्वारगेट पोलिसांनी तडाख्यात घेतले आहे. पोलिसांनी तिला गुप्त माहितीच्या आधारे रंगेहाथ पकडले असून तिच्याकडून तब्बल ₹२,७०,००० किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईतून स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल असलेले एकूण तीन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

स्वारगेट परिसरातील एसटी स्टॅंड आणि पीएमपीएमएल बस स्टॉप येथे गर्दीचा फायदा घेत दागिने चोरी होण्याच्या घटना वारंवार घडत होत्या. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांनी विशेष तपास पथक स्थापन करून पेट्रोलिंगसाठी सूचना दिल्या होत्या.

तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर, अंमलदार सुजय पवार व संदीप घुले हे दि. १६ मे रोजी गस्त घालत असताना त्यांना एक गुप्त माहिती मिळाली की, एक संशयित महिला चोरीचे सोने विकण्यासाठी स्वारगेटजवळ आली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिला ताब्यात घेतले. तिचे नाव भाग्यश्री जितेश कसबे (वय ४०, रा. कळसगाव, विश्रांतवाडी, पुणे) असे असून, ती मूळची लातूरची आहे.

तिची अंगझडती घेतल्यावर पर्समध्ये विविध प्रकारचे सोन्याचे दागिने आढळले. पोलिसांनी तीला स्वारगेट पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली असता, तिने मागील काही महिन्यांपासून एसटी स्टॅंड परिसरात गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली.

तपासादरम्यान, तिच्याविरोधात गुन्हा रजिस्टर नं. १२७/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील सुमारे ₹२.७० लाख किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले असून, आणखी दोन गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

ही उल्लेखनीय कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ २) श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली. या कामगिरीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांच्या आदेशानुसार सपोनि राहुल कोलंबीकर, पो.उपनि. रविंद्र कस्पटे आणि त्यांचे तपास पथकातील सदस्य – अश्रुबा मोराळे, हर्षल शिंदे, सुजय पवार, संदीप घुले, फिरोज शेख, रमेश चव्हाण, दिपक खेंदाड, प्रशांत टोणपे, हनुमंत दुधे यांनी मोलाची भूमिका बजावली.

स्वारगेट पोलीस ठाण्याची ही कामगिरी अत्यंत कौतुकास्पद असून, शहरात महिला चोरट्यांवर पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे.