Home Breaking News भरधाव कारची भीषण धडक; अल्पवयीन मुलाचा मृत्यू – कोंढवा पोलिसांनी आरोपी चालकास...

भरधाव कारची भीषण धडक; अल्पवयीन मुलाचा मृत्यू – कोंढवा पोलिसांनी आरोपी चालकास केली तात्काळ अटक

110
0

कोंढवा परिसरातील भोलेनाथ चौकात भरधाव वेगात चालविलेल्या कारच्या धडकेत एक १३ वर्षांचा अल्पवयीन मुलगा जागीच ठार झाला असून, या प्रकरणाने संपूर्ण पुणे शहर हादरले आहे. अपघातानंतर कोंढवा पोलिसांनी तात्काळ कार चालकाला अटक केली असून, न्यायालयाने त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडी रिमांड मंजूर केली आहे.


अपघाताची संपूर्ण घटना

दि. १८ मे रोजी जैद नसिर शेख (वय २३, रा. भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द) हा त्याच्या काही मित्रांसोबत इनोव्हा कार (SUV) चालवत असताना भोलेनाथ चौकात अत्यंत भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे गाडी चालवत होता. कोंढवा गावातील अरुंद रस्त्यावर असताना त्याने वाहनावर नियंत्रण गमावून रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या एका १३ वर्षांच्या बालकाला जोरात धडक दिली.

धडकेनंतर मुलगा रस्त्यालगतच्या बिल्डिंगच्या गेटमध्ये दाबला गेला आणि गेट तोडून कार थेट बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये घुसली. या भीषण अपघातात मुलगा गंभीर जखमी झाला. तात्काळ त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

 तात्काळ गुन्हा दाखल व अटक

कोंढवा पोलिसांनी अत्यंत तत्परतेने कार चालक जैद शेख यास अटक केली असून, त्याच्यावर गु.र.नं. ४०१/२०२५ नुसार भादंवि कलम १०६(१), २८१, ३२४(४) तसेच मोटार वाहन कायद्यानुसार कलम ११९/१७७, १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पोलिस कस्टडी नाकारून मॅजिस्ट्रेट कस्टडी (Magisterial Custody) मंजूर केली आहे.

 अधिक तपास सुरू

या गंभीर प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक सचिन थोरात यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून, या कामगिरीसाठी अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त श्री. धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, निरीक्षक रौफ शेख, नवनाथ जगताप, सहा. निरीक्षक राकेश जाधव आणि पोलीस अंमलदार जितू गायकवाड यांनी कारवाईत सहभाग घेतला.

 नागरिकांचा संताप; कठोर शिक्षेची मागणी

या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. भरधाव वाहनचालकांवर कठोर कारवाई करावी आणि अशा अपघातांना आळा बसावा, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे. यासोबतच रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.