फुरसुंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने पुणे शहर हादरले होते. मृताच्या डोक्याला आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापती झाल्याचे आढळून आले होते. ही घटना अत्यंत निर्घृण स्वरूपाची असून पोलीस प्रशासनाने तातडीने तपास सुरू केला.
मृताची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून मृताचे नाव हनिफ मुसा शेख (वय ३०, रा. कृष्णानगर, महमदवाडी, पुणे) असे आहे. १० मे २०२५ रोजी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ९२/२०२५ अन्वये भारतीय दंड संहिता कलम १०३ (खून) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांचा कसून तपास:
या गुन्ह्याच्या समांतर तपासासाठी गुन्हे शाखा युनिट ५ आणि ६ ची पथके तयार करण्यात आली. तब्बल ५० पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आली. अनेक गोपनीय माहिती स्रोतांचा आधार घेत तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास पुढे नेण्यात आला. तीन दिवस अहोरात्र तपास केल्यानंतर पोलिसांना गुन्हेगाराचा ठावठिकाणा लागला.
तपासात निष्पन्न झाले की, सदर खून हा आसिफ युनूस शेख (वय २५, रा. गल्ली नं. ५, सय्यदनगर, हडपसर, पुणे) याने केला आहे. गुन्हा करून तो आपल्या मूळ गावी शास्त्रीनगर, लातूर येथे पलायन केल्याची माहिती मिळाली.
लातूर येथून आरोपी जेरबंद:
दिनांक १३ मे २०२५ रोजी, पोलिस निरीक्षक मदन कांबळे, पो.हवा. प्रताप गायकवाड, पो.अं. अकबर शेख यांच्या नेतृत्वाखालील टीमने शास्त्रीनगर, लातूर येथे जाऊन आरोपीला अटक केली. पुणे येथे आणल्यानंतर सखोल चौकशीत आरोपीने जुना वाद असल्यामुळे मृताच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचे कबूल केले.
पुढील तपास:
आरोपीस पुढील तपासासाठी फुरसुंगी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून न्यायप्रविष्टेसाठी त्याची रवानगी करण्यात आली आहे.
अधिकारी व पथकांचे कौतुक:
ही यशस्वी कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. निखिल पिंगळे, व सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे २) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पो. नि. मदन कांबळे, पो. हवा. बाळासाहेब सकटे, स. फौज. राजस शेख, अकबर शेख, प्रमोद टिळेकर, अमित कांबळे, संजय दळवी यांच्यासह युनिट ५ व ६ च्या अधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली.





