Home Breaking News देशातील गतिमान आरोग्य सेवा जगभरात गाजली; छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रू बीम युनिटचे लोकार्पण

देशातील गतिमान आरोग्य सेवा जगभरात गाजली; छत्रपती संभाजीनगरमध्ये ट्रू बीम युनिटचे लोकार्पण

121
0

छत्रपती संभाजीनगर : देशातील आरोग्य क्षेत्राने जगभरात आपल्या प्रगतीचा ठसा उमठवला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा यांनी सांगितले की, देशात उपचार सुविधांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून कर्करोगावर विशेष भर देण्यात आला आहे. चालू वर्षात लवकर निदान झालेल्या ९० टक्के कर्करोग रुग्णांवर ३० दिवसांच्या आत उपचार सुरू करण्यात आले आहेत. या गतिमान कार्याची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली आहे, ही गौरवास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कर्करोग रुग्णालयात अत्याधुनिक ‘ट्रू बीम युनिट’चा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय मंत्री नड्डा यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी दोन्ही नेत्यांनी आरोग्य क्षेत्रातील भारताच्या वाटचालीचे विविध पैलूंवर भाष्य केले.

केंद्रीय मंत्री नड्डा म्हणाले, “२०१९ मध्ये भूमिपूजन केलेल्या जागेवर आज भव्य, आधुनिक रुग्णालय उभे राहिले आहे, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. देशभरात २०० डे केअर सेंटर्स उभारण्यात येणार असून कर्करोगासाठी त्वरित निदान व उपचारासाठी प्रयत्न सुरू आहेत.” ते पुढे म्हणाले की, “१०० नवीन नर्सिंग कॉलेजेस सुरू करण्याचे नियोजन असून वैद्यकीय शिक्षणासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.”

कर्करोग रुग्णांसाठी ‘ट्रू बीम’ प्रणाली अतिशय वरदान ठरणार आहे. या तंत्रज्ञानामुळे फक्त संक्रमित भागावर नेमकेपणाने रेडिएशन उपचार करता येणार असून त्यामुळे उपचाराचा दर्जाही उंचावेल. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार सुविधा दिली जात आहे, याचीही त्यांनी आठवण करून दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, “छत्रपती संभाजीनगरमध्ये अशी सुविधा उपलब्ध होणे ही मराठवाडा तसेच लगतच्या जिल्ह्यांसाठी मोठी देणगी आहे. आतापर्यंत या भागातील रुग्णांना मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलपर्यंत जावे लागत होते. आता स्थानिक पातळीवरच उच्च दर्जाचे उपचार उपलब्ध होणार आहेत.”

ते पुढे म्हणाले की, “जगभरातील तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आपण आरोग्य सेवेला अधिकाधिक गतिमान व सर्वसमावेशक बनवत आहोत. कर्करोगासारख्या गंभीर आजारांवर स्थानिक स्तरावर त्वरित उपचार सुविधा उपलब्ध करून देणे ही आरोग्य क्षेत्रातली मोठी क्रांती ठरणार आहे.”

देशभरातील १ लाख ७५ हजार आयुष्मान आरोग्य केंद्रांमधून प्राथमिक आरोग्य सेवा पोहोचवली जात आहे. स्क्रिनिंग क्षमतेत वाढ केल्यामुळे तोंडाचा व स्तनाचा कर्करोग वेळीच ओळखता येत आहे, ज्यामुळे रुग्णांचे जीवन वाचविण्याचे प्रमाणही वाढले आहे.

केंद्रीय मंत्री नड्डा यांनी यावेळी १५ व्या वित्त आयोगातून ७ हजार कोटी रुपयांची तरतूद आरोग्य सेवेसाठी करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच देशभरात ७८० वैद्यकीय महाविद्यालये सुरू असून यामुळे आरोग्य शिक्षण क्षेत्रही बळकट होत आहे.

या ऐतिहासिक उपक्रमामुळे भारताच्या आरोग्य क्षेत्राला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळाली असून आरोग्य सेवा आणखी गतिमान आणि सर्वसमावेशक होण्याच्या दिशेने देश निश्चितपणे वाटचाल करत आहे.