जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे काल झालेला दहशतवादी हल्ला हा केवळ एक हिंसाचार नव्हता, तर तो देशाच्या शांततेवर आणि मानवतेवर झालेला प्रहार होता. या भ्याड हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. पर्यटकांवर उद्देशून केलेल्या या गोळीबारात अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात ३० जणांना प्राण गमवावे लागले असून, महाराष्ट्रातील सहा नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.
पुण्यातील संतोष जगदाळे व कौस्तुभ गणवोटे यांचा दुर्दैवी अंत
पुण्याचे सुपुत्र संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणवोटे हे आपल्या कुटुंबासह पर्यटनासाठी काश्मीरच्या पहलगाममध्ये गेले होते. त्यांच्या आयुष्यातील ही सहल शेवटची ठरली. संतोष जगदाळे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कौस्तुभ गणवोटे यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला. जगदाळे कुटुंबाच्या घरी शोककळा पसरली असून नातेवाईक व मित्रमंडळींनी त्यांच्या घरी गर्दी केली आहे.
आसावरी जगदाळे यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत या हल्ल्याचे भयावह वर्णन केले. “गोळीबारानंतर आम्ही तंबूत शिरलो. त्यांनी संतोष यांना बाहेर बोलावलं आणि कलमा म्हणण्यास सांगितलं. त्यांनी नकार दिल्यावर त्यांना डोक्यात, पाठीत आणि कानात गोळ्या घातल्या,” असं सांगताना आसावरी यांचे अश्रू थांबले नाहीत.
डोंबिवलीतील तीन मावसभावांचा मृत्यू, संपूर्ण शहर हळहळले
हल्ल्यात डोंबिवलीतील अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी या तिघांचा मृत्यू झाला. हे तिघे मावसभाऊ एकत्रच फिरायला गेले होते. अतुल मोने हे मध्य रेल्वेच्या परळ कार्यशाळेत अभियंता म्हणून कार्यरत होते. संजय लेले आपल्या पत्नी व मुलासोबत गेले होते. त्यांचा मुलगाही या हल्ल्यात जखमी झाला आहे. डोंबिवलीतील विजयश्री हाउसिंग सोसायटीमध्ये शोकसंतप्त वातावरण निर्माण झालं आहे.
राज्य सरकारची तत्पर मदत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या नातेवाईकांशी त्यांनी संपर्क साधून सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिलं आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील पुण्यातील कुटुंबांशी संपर्कात आहेत. प्रशासनाकडून मृतदेह तातडीने पुण्यात आणण्याची व्यवस्था केली जात आहे.
अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाइन सुरू







