मुंबई – महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागातील २००२ मधील एक अत्यंत महत्त्वाची फाईल रहस्यमय परिस्थितीत गायब झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी सार्वजनिक नोंदी कायद्यानुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
शरद श्रीपतराव मकने (वय ४७), हे मुंबईतील शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागातील विभाग अधिकारी असून, त्यांनी फाईल हरविल्याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. मकने हे रायगड जिल्ह्यातील खांदा कॉलनी, नवीन पनवेल (पश्चिम) येथे राहतात.
ही फाईल २९ जून २००२ रोजी जारी करण्यात आलेल्या एका आदेशावर आधारित प्रस्तावाशी संबंधित होती. सदर माहितीचा मागणी अर्ज २१ सप्टेंबर २०२२ रोजी सिद्धांत विजय आव्हाणे या नागरिकाने माहिती अधिकार कायद्यानुसार ऑनलाइन पद्धतीने केला होता.
मात्र, अनेक वेळा विनंती करूनही व माहिती आयोगाकडे अपील करूनही ही फाईल सापडू शकली नाही. नोव्हेंबर व डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान, सदर फाईल ही ना संबंधित टेबलवरील नोंदीत, ना आर्काइव्हमध्ये आढळल्याचे स्पष्ट करण्यात आले.
राज्य माहिती आयुक्तांनी सदर प्रकरण गांभीर्याने घेतले व महाराष्ट्र सार्वजनिक नोंदी अधिनियम २००५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. ही फाईल हरवली गेली की मुद्दाम नष्ट करण्यात आली, यावर संशय व्यक्त करण्यात आला.
यापूर्वीही फाईल शोधण्यास वेळ मागून देण्यात आला होता. अखेरीस २१ मार्च २०२५ रोजीच्या अंतिम आदेशात फाईल अजूनही सापडली नसल्यामुळे कायदेशीर कारवाईचे निर्देश देण्यात आले.
ही बाब केवळ प्रशासनातील निष्काळजीपणाचं नाही तर माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. सदर फाईलमुळे कोणत्या निर्णयांना कायदेशीर स्वरूप देण्यात आले होते हे अद्याप अंधारात आहे.