Home Breaking News शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली १.६० कोटींची फसवणूक – पुणे सायबर पोलिसांची मोठी...

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली १.६० कोटींची फसवणूक – पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई!

36
0

पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा परतावा देण्याच्या बहाण्याने पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १ कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीला पुणे सायबर पोलिसांनी अखेर गजाआड केले आहे. या प्रकरणात ६ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या टोळीने देशभरातील २९ राज्यांमध्ये अशा प्रकारची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

कसे घडले हे आर्थिक गुन्हे?

पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला व्हॉट्सअॅप कॉलद्वारे अनन्या गुप्ता नावाच्या महिलेने संपर्क साधला. तिने G5 UP Stox Value-Added Technical Information Sharing, Rajat Parmar Growth Visionary Blinkx PEI, (132) Star Alliance यांसारख्या वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये त्यांना जोडले. त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधून मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले.

त्या आमिषाला बळी पडत फिर्यादीने वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये १.६० कोटी रुपये जमा केले, मात्र काही दिवसांनी त्या पैशांचा कोणताही परतावा मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

सायबर पोलिसांची झडती आणि मोठी कारवाई!

पोलिसांनी तपासादरम्यान पुण्यातील वाघोलीमधील एका बँक खात्यातून १७ मार्च २०२५ रोजी ५.८२ लाख रुपये चेकमार्फत काढण्यात आल्याचे आढळले. यावरून पोलिसांनी केतन उमेश भिवरे (वय २७, रा. खराडी, पुणे) याला अटक केली. त्याच्याकडून अधिक चौकशी केल्यानंतर त्याचा भाऊ निखिल ऊर्फ किशोर जगन्नाथ सातव (वय ३२, रा. वाघोली, पुणे) याने मोठ्या प्रमाणात बनावट बँक खाती उघडल्याचे समोर आले.

या आरोपींनी पुणे, मुंबई, गुजरात, पश्चिम बंगाल आणि दुबईपर्यंत आर्थिक फसवणुकीचे जाळे पसरवले होते. सायबर पोलिसांनी मोठ्या शिताफीने गोविंद संजय सुर्यवंशी (वय २२), रोहित सुशिल कंबोज (वय २३), बाबाराव उर्फ ओमकार भवर (वय २२) आणि जब्बरसिंह अर्जुनसिंह पुरोहित (वय ४५) यांनाही अटक केली.

टेक्नॉलॉजीचा वापर करून मोठ्या प्रमाणात फसवणूक!

▪️ या आरोपींनी १०० ते १५० बँक खाती वापरून सायबर फसवणूक केली होती.
▪️ आरोपी क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारात सक्रिय होते आणि ते फसवलेल्या रकमेचा वापर युएसडीटी क्रिप्टो ट्रान्सफरद्वारे करत होते.
▪️ यातील मुख्य आरोपींनी डिजिटल मार्केटिंग कंपन्या उघडल्या होत्या आणि पुढील १० वर्षांत १०० कंपन्या सुरू करण्याचे स्वप्न पाहिले होते.
▪️ दुबई, गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये या टोळीचे मोठे कनेक्शन असल्याचेही उघड झाले आहे.

१२ दिवस पोलीस कोठडी मंजूर – तपास सुरूच!

पोलिसांनी न्यायालयात सर्व आरोपींना हजर केले असता त्यांना १२ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या तपासात पोलिसांना देशभरातील २९ तक्रारींची माहिती मिळाली आहे, त्यामुळे हे गुन्हे अधिक गहिरे असण्याची शक्यता आहे.

 पुणे सायबर पोलीस ठाणे या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या प्रकरणात आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे आणि कोणत्याही अनोळखी गुंतवणुकीच्या प्रस्तावांना बळी पडू नये.

 आर्थिक फसवणुकीला बळी पडल्यास त्वरित सायबर पोलिसांशी संपर्क साधावा!