Home Breaking News आमदार सुनील शेळके यांचे विधानसभेत घणाघाती भाषण, विविध मागण्यांसाठी सरकारला निर्वाणीचा इशारा

आमदार सुनील शेळके यांचे विधानसभेत घणाघाती भाषण, विविध मागण्यांसाठी सरकारला निर्वाणीचा इशारा

284
0

मुंबई :– मावळचे आमदार सुनील शेळके यांनी महाराष्ट्र विधानसभेत अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान आपल्या घणाघाती भाषणातून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी सरकारचे लक्ष वेधून तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली. त्यांनी पाणीपुरवठा योजना, सार्वजनिक सुरक्षाव्यवस्था आणि अमली पदार्थांचा वाढता प्रभाव यासंदर्भात ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.

अर्धवट योजनांबाबत चौकशी व दोषी ठेकेदारांवर कारवाईची मागणी

आमदार शेळके यांनी जल जीवन मिशन आणि MGP योजनांवरून सरकारला धारेवर धरले. पुणे जिल्ह्यात जल जीवन मिशनअंतर्गत १२३९ योजना मंजूर असून, त्यासाठी तब्बल २०९० कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे MGP योजनांसाठी ४००० कोटी रुपये मंजूर असून, अद्यापही अनेक योजना अर्धवट स्थितीत असल्याची माहिती त्यांनी दिली.

“या योजनांपैकी तब्बल ३५ ते ४० टक्के योजना रखडल्या आहेत. या अपूर्ण राहिलेल्या योजनांची सखोल चौकशी करून संबंधित दोषी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे,” अशी ठाम मागणी आमदार शेळके यांनी विधानसभेत केली.

ग्रामीण भागात सीसीटीव्ही बसविण्याची गरज

सुरक्षेच्या दृष्टीने केवळ शहरी भागापुरतेच नव्हे तर ग्रामीण भागातही सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गरज असल्याचे शेळके यांनी स्पष्ट केले. यामुळे गावांमध्ये होणाऱ्या चोरी, गैरप्रकार आणि महिलांविरोधातील गुन्हे कमी करण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“पर्यटन स्थळे, गर्दीची ठिकाणे आणि महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसवणे अनिवार्य आहे,” असेही शेळके यांनी अधोरेखित केले.

शाळा-कॉलेज परिसरातील पानटपऱ्या हटविण्याची मागणी

आमदार शेळके यांनी शिक्षण संस्थांच्या आसपास असलेल्या पानटपऱ्या हटविण्याची जोरदार मागणी केली. पानटपऱ्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अमली पदार्थांचा सहज प्रवेश मिळत असल्याने अशा टपऱ्या तातडीने हटवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

“विद्यार्थ्यांना सावरण्यासाठी आणि त्यांना वाईट सवयींपासून दूर ठेवण्यासाठी पानटपऱ्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे,” असे शेळके म्हणाले.

सरकारला निर्वाणीचा इशारा

आमदार सुनील शेळके यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी सरकारला इशारा देत म्हटले की, “या मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.” त्यांच्या भाषणानंतर सभागृहात काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.