Home Breaking News आझाद चौकात भीषण आग; १० हून अधिक दुकानं खाक, लाखोंचं नुकसान

आझाद चौकात भीषण आग; १० हून अधिक दुकानं खाक, लाखोंचं नुकसान

127
0

छत्रपती संभाजीनगरच्या आझाद चौक परिसरात रात्री उशिरा भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत १० हून अधिक दुकानं जळून खाक झाली असून, मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

आगीनं व्यापारी वर्ग हतबल

रात्री उशिरा आझाद चौक परिसरात अचानक धुराचे लोट दिसू लागले. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. दुकानांमध्ये असलेला कापड, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर आणि इतर साहित्य जळून खाक झाले. घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र आग झपाट्याने पसरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

अग्निशमन दलाची तत्पर कारवाई

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

आगीचं कारण अद्याप अस्पष्ट

आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

व्यापाऱ्यांचं प्रशासनाकडे मदतीसाठी मागणं

या घटनेनंतर व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे. नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.