नासाच्या सुप्रसिद्ध अंतराळवीर सुनीता विल्यम्स अखेर 286 दिवसांच्या प्रदीर्घ अंतराळ प्रवासानंतर पृथ्वीवर सुखरूप परतल्या आहेत. भारतीय वेळेनुसार आज (19 मार्च) पहाटे 3.30 वाजता सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर सुरक्षितपणे उतरले. दोघेही इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या ‘ड्रॅगन’ यानाच्या सहाय्याने पृथ्वीवर परतले आहेत.
महत्त्वाचा प्रवास आणि संशोधनाची कामगिरी
सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर हे 5 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) पोहोचले होते. त्यांचा हा प्रवास केवळ 8 दिवसांचा होता. मात्र, काही तांत्रिक बिघाडांमुळे त्यांना 9 महिने तिथे थांबावे लागले. अखेर, या दीर्घ प्रतीक्षेनंतर त्यांनी 286 दिवसांनंतर पृथ्वीवर यशस्वीरित्या पुनरागमन केले.
इतिहासात नवे पान
सुनीता विल्यम्स यांनी अंतराळात सर्वाधिक काळ राहणारी महिला म्हणून इतिहास रचला आहे. त्यांचा हा प्रवास केवळ अस्तित्व टिकवण्यासाठी नव्हता, तर त्यांनी या कालावधीत तब्बल 900 तासांचे संशोधन केले. यादरम्यान त्यांनी 150 हून अधिक वैज्ञानिक प्रयोग यशस्वीरित्या पूर्ण केले.
त्यांच्या संशोधनामध्ये विशेषतः पाणी आणि इंधनाच्या पेशींसाठी नवे रिअॅक्टर्स विकसित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करण्यात आले. या संशोधनामुळे भविष्यातील अंतराळ मोहिमांसाठी मोठी मदत होणार आहे.
नासाकडून लँडिंगचा व्हिडीओ प्रसिद्ध
नासाने सुनीता विल्यम्स यांच्या लँडिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यांच्या शौर्याबद्दल जागतिक स्तरावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
क्रू-9 टीमची यशस्वी परतफेड
सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर यांच्यासोबत निक हेग आणि अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हे क्रू-9 चे इतर अंतराळवीर देखील सुखरूप पृथ्वीवर परतले आहेत.
सुनीता विल्यम्स – एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व
भारतीय वंशाच्या या अंतराळवीर महिलेने अंतराळ विज्ञान क्षेत्रात एक महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्यांची ही यशस्वी मोहिम तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.