Home Breaking News नागपूर हिंसाचार: पोलीस उपायुक्तांवर कुऱ्हाडीचा हल्ला, मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे विचारपूस

नागपूर हिंसाचार: पोलीस उपायुक्तांवर कुऱ्हाडीचा हल्ला, मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे विचारपूस

नागपूर शहर सोमवारी रात्री भीषण दंगलीच्या विळख्यात सापडले. महाल परिसरात औरंगजेबच्या कबरीच्या वादावरून दोन गटांमध्ये निर्माण झालेल्या तणावाने काही वेळातच उग्र स्वरूप धारण केले. या घटनेत मोठ्या प्रमाणावर दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. जमावाने पोलिसांवरही थेट हल्ले केले, ज्यामध्ये ४० हून अधिक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. विशेषतः, पोलीस उपायुक्त (DCP) निकेतन कदम यांच्या हातावर जमावाने कुऱ्हाडीने हल्ला केला, त्यामुळे ते रक्तबंबाळ झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप, पोलिसांना दिलासा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, १८ मार्च, व्हिडीओ कॉलद्वारे पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या तब्येतीची विचारपूस केली. या संभाषणात फडणवीस यांनी कदम यांना धीर दिला आणि लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी हा कॉल सोशल मीडियावरही शेअर केला आणि नागपूर पोलिसांच्या धैर्याला सलाम केला. तसेच, पोलिसांवरील हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संतप्त जमावाने पोलिसांवर थेट हल्ले

सोमवारी संध्याकाळी महाल भागात औरंगजेबच्या कबरीच्या वादावरून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला. काही वेळातच हा वाद वाढत गेला आणि जमावाने रस्त्यावर उतरून दगडफेक सुरू केली. परिस्थिती हाताळण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. मात्र, संतप्त जमावाने पोलिसांवरच हल्ला चढवत जाळपोळ सुरू केली.

यामध्ये, डीसीपी शशिकांत सातव यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. तर डीसीपी अर्चित चांडक यांना गंभीर लिगामेंटल इंज्युरी झाल्याचे समोर आले आहे. या तिघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन

या घटनेनंतर पोलिसांनी शहरात कलम १४४ लागू केले असून, मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत. नागपूर पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे सांगितले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले असून, या हिंसाचाराला जबाबदार असलेल्या दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे. नागपूर पोलिसांनी देखील या प्रकरणी चौकशी सुरू केली असून अनेक संशयितांना ताब्यात घेतले आहे.