Home Breaking News वानवडी पोलिसांची मोठी कामगिरी : न्यूड फोटो मॉर्फिंग प्रकरणी गुन्हेगाराला अटक

वानवडी पोलिसांची मोठी कामगिरी : न्यूड फोटो मॉर्फिंग प्रकरणी गुन्हेगाराला अटक

51
0

पुण्यातील वानवडी पोलिसांनी इन्स्टाग्रामवर मॉर्फिंग केलेले न्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या आरोपीला अटक करून मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई सायबर गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

🔹 प्रकरणाचा तपशील:

एका अनोळखी इसमाने पीडित महिलेचे फोटो आणि नाव वापरून इन्स्टाग्राम आयडी तयार केला. त्यानंतर या आयडीवरून महिलेकडे २,००० रुपये खंडणीची मागणी करण्यात आली. पैसे दिले नाही तर मॉर्फिंग केलेले न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी आरोपीने दिली.

महिलेने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने महिलेचे भाऊच्या इन्स्टाग्राम आयडीवर बनावट मॉर्फिंग केलेले न्यूड फोटो पाठवले. यानंतर त्याने पुन्हा पैशांची मागणी सुरू ठेवली.

🔹 पोलिसांची प्रभावी कारवाई:

या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच वानवडी पोलिस ठाण्यातील सायबर टीमने तातडीने तपास सुरू केला. पोलीस हवालदार अमोल पिलाणे व अतुल गायकवाड यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती घेतली. तपासादरम्यान आरोपी रघुवर बलराम चौधरी (वय १९, रा. अंबिका जनरल स्टोअर्स शेजारी, शिंदेवस्ती, हडपसर, पुणे; मूळ बिहार) याची ओळख पटली.

आरोपीचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर आणि त्याच्या मोबाईलची तपासणी केल्यानंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला १३ मार्च २०२५ रोजी अटक करण्यात आली असून, त्याला १७ मार्च २०२५ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.

🔹 प्रशासनाचे मार्गदर्शन आणि विशेष पथक:

ही कारवाई पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहर डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त श्री. धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सत्यजित आदमाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोविंद जाधव, पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव, पोलीस अंमलदार अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, सर्फराज देशमुख, सोमनाथ कांबळे आणि सुजाता फुलसुंदर या विशेष पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

🔹 सायबर गुन्हेगारीवर पोलिसांचा इशारा:

या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. सोशल मीडियाचा वापर करताना गोपनीय माहिती शेअर करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.