पुणे : पुणे जिल्ह्यातील आळंदी म्हातोबाची परिसरात अफू या घातक अंमली पदार्थाची लागवड करत अवैध विक्रीसाठी साठा करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी छापा टाकत एका महिलेला अटक केली आहे.
🔹 कसा झाला प्रकार उघडकीस?
दि. १४ मार्च २०२५ रोजी दुपारी सुमारे ३ वाजता, लोणी काळभोर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, आळंदी म्हातोबाची येथील जगताप मळा रोड परिसरात एका प्लॉटिंगजवळील शेतात अफूची लागवड करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ दोन पंचांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी छापा टाकला. तपासणी दरम्यान गट नंबर ७७५ या जागेत ४० हजार रुपये किमतीची, एकूण ४ किलो वजनाची ६६ अफूची झाडे आढळून आली. पोलिसांनी पंचनाम्यानंतर सदर झाडे ताब्यात घेतली.
🔹 आरोपी महिला ताब्यात
या प्रकरणात पोलिसांनी मंगल दादासो जवळकर (वय ४५, रा. अमराई वस्ती, आळंदी म्हातोबाची, ता. हवेली, जि. पुणे) या महिलेला अटक केली आहे. तिच्याविरुद्ध एन. डी. पी. एस. अॅक्ट कलम ८ ब, १८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
🔹 यापूर्वीही कारवाई
लोणी काळभोर पोलिसांच्या हद्दीत यापूर्वीदेखील अशा प्रकारच्या अवैध अफू लागवडीविरोधात दोन वेळा कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, अशा अवैध धंद्यांवर कडक कारवाई करून या गुन्हेगारीचे उच्चाटन केले जाईल.
🔹 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उप निरीक्षक अनिल जाधव, तसेच क्षिरसागर, वणवे, सातपुते, कटके, कुदळे, नानापुरे, तेलंगे, निकंबे, यादव आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
🔹 पोलिसांचे नागरिकांना आवाहन
अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात पोलिसांची कारवाई सतत सुरू राहील. नागरिकांनी अशा गैरकृत्यांविषयी माहिती मिळाल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन लोणी काळभोर पोलिसांकडून करण्यात आले आहे.