Home Breaking News मुंबईत उन्हाचा कडाका वाढतोय; हवेच्या गुणवत्तेत घसरण, नागरिकांनी घ्यावी काळजी

मुंबईत उन्हाचा कडाका वाढतोय; हवेच्या गुणवत्तेत घसरण, नागरिकांनी घ्यावी काळजी

78
0

मुंबई : मुंबईतील वातावरणात लक्षणीय बदल दिसून येत असून शहरात उन्हाचा कडाका वाढत चालला आहे. तापमानातील चढ-उतारामुळे थंड हवामानाचा प्रभाव कमी होत असून उष्णतेचा प्रभाव वाढत असल्याचे जाणवत आहे.

तापमानात वाढ; उन्हाचा प्रभाव जाणवणार

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, ११ मार्च रोजी मुंबईत आकाश स्वच्छ राहील, मात्र दुपारनंतर उष्णतेचा प्रभाव जाणवेल. शहरात साधारणपणे ५ किमी/तास वेगाने सौम्य वारे वाहणार असून आर्द्रतेचे प्रमाण ४२% राहील. यामुळे उन्हाळ्याची तीव्रता वाढताना जाणवणार आहे.

तापमान ३४ अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज असून सकाळी ६.५१ वाजता सूर्योदय तर संध्याकाळी ६.४७ वाजता सूर्यास्त होईल. थंडीचा प्रभाव जवळपास नाहीसा झाल्याने नागरिकांना उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.

१२ मार्चलाही उष्णतेचा प्रभाव कायम

हवामान खात्याच्या माहितीनुसार, १२ मार्च रोजी मुंबईतील वातावरण तसेच राहण्याची शक्यता आहे. तापमान २३ अंश ते ३४ अंशांपर्यंत राहील. उन्हाची तीव्रता आणि हवेतील उष्णता लक्षात घेता येत्या काही दिवसांत उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवेची गुणवत्ता बिघडली; आरोग्यावरील परिणामाची शक्यता

मुंबईत वाढत्या उष्णतेसह हवेच्या गुणवत्तेतही घसरण झाली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) अहवालानुसार, मुंबईतील हवेची गुणवत्ता निर्देशांक (AQI) १५३ वर पोहोचली असून ही पातळी ‘मध्यम’ श्रेणीत आहे. विशेषतः श्वसनास त्रास होणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

प्रमुख भागांतील AQI स्तर

➡️ डिओनार – २१८ (खराब)
➡️ बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स – २०५ (खराब)
➡️ चेंबूर – १८४ (मध्यम)
➡️ कुर्ला, शिवाजी नगर – १२३ (मध्यम)
➡️ माझगाव डॉकयार्ड – १५७ (मध्यम)
➡️ कांदिवली पश्चिम – ८८ (समाधानकारक)

नागरिकांना सूचना

✅ घराबाहेर पडताना सनग्लासेस, टोपी किंवा स्कार्फचा वापर करावा.
✅ शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळीच व्यायाम करावा.
✅ दुपारच्या वेळी थेट उन्हात जाणे टाळावे.
✅ वृद्ध, लहान मुले आणि श्वसनाचे आजार असणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी.

मुंबईकरांनी आगामी उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.