पुणे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून परिमंडळ १, पुणे शहर पोलिसांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या महत्वाकांक्षी मोहिमेच्या अनुषंगाने भव्य महिला पोलीस बाईक रॅलीचे आयोजन केले. ७ मार्च २०२५ रोजी शनवारवाडा येथून सुरू झालेल्या या भव्य रॅलीमध्ये महिलांच्या सामर्थ्याचा अद्वितीय नजारा पाहायला मिळाला.
महिला दिनाचा भव्य उत्सव – महिला पोलिसांचा जोश!
परिमंडळ १ कार्यक्षेत्रात ७ मार्च ते १० मार्च २०२५ दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यातील प्रमुख आकर्षण म्हणजे महिला पोलिसांची बाईक रॅली! या रॅलीमध्ये ३० ते ४० दुचाकींवर ४ पोलीस निरीक्षक, ६ महिला सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि तब्बल ६० महिला अंमलदार सहभागी झाल्या.
शनिवारवाड्यापासून बालगंधर्व चौकापर्यंत उत्साही महिला बाईक रॅली!
या बाईक रॅलीला पोलीस उप आयुक्त संदीप सिंह गिल्ल यांनी हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. शनिवारवाडा येथून निघालेली ही भव्य रॅली शिवाजी रोड, बुधवार चौक, बेलबाग चौक, लक्ष्मी रोड, सेवासदन, अलका टॉकीज चौक, डेक्कन पोलीस हद्द, खंडोजी बाबा चौक, गुडलक चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, मॉर्डन कॉलेज रोड मार्गे जात बालगंधर्व चौक येथे समारोप करण्यात आला.
महिला दिनाच्या शुभेच्छा आणि गौरव सोहळा!
रॅलीच्या समारोप प्रसंगी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी उपस्थित राहून महिला पोलिसांचे विशेष कौतुक केले आणि पुष्पगुच्छ देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, महिलांच्या सहभागामुळे समाजात सकारात्मक बदल घडत असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
पोस्टरच्या माध्यमातून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा जनजागृती संदेश!
रॅलीदरम्यान महिला पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या मोहिमेचा प्रचार करणारे पोस्टर नागरिकांना दाखवले आणि महिलांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती निर्माण झाली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन – उत्स्फूर्त सहभाग!
सदर बाईक रॅलीचे आयोजन अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर प्रविणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यामध्ये पोलीस उप आयुक्त परिमंडळ १, पुणे शहर संदीप सिंह गिल्ल, सहायक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रामबाग पोलीस ठाणे विजयमाला पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डेक्कन पोलीस ठाणे गिरीषा निंबाळकर, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा खडक पोलीस ठाणे शर्मिला सुतार यांनी विशेष परिश्रम घेतले.
महिला सबलीकरणाचा नवा अध्याय!
या भव्य बाईक रॅलीमुळे पुणे शहरात महिला पोलिसांचे सामर्थ्य अधोरेखित झाले. महिलांनी केवळ कुटुंबातच नव्हे, तर सर्वच क्षेत्रांमध्ये आपली कर्तबगारी सिद्ध केली आहे. समाजाच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलिसांचे हे योगदान खरोखरच गौरव करण्यासारखे आहे.