Home Breaking News पुणेकरांना सायबर गुन्ह्यांचा फटका – २०२४ मध्ये ₹६,००७ कोटींचे आर्थिक नुकसान! पुणे...

पुणेकरांना सायबर गुन्ह्यांचा फटका – २०२४ मध्ये ₹६,००७ कोटींचे आर्थिक नुकसान! पुणे पोलिसांचा सायबर सुरक्षेसाठी मोठा निर्णय

पुणे, ८ मार्च: महाराष्ट्र विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या अहवालानुसार २०२४ मध्ये पुणेकरांना सायबर गुन्ह्यांमुळे तब्बल ₹६,००७ कोटींचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. एकूण १,५०४ प्रकरणांमध्ये एवढा मोठा फटका बसल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मुंबई, नागपूर आणि ठाणे या तिन्ही शहरांतील एकत्रित नुकसानाच्या तुलनेत पुण्याचे नुकसान पाचपट अधिक आहे.

मुंबईत ४,८४९ प्रकरणांमध्ये ₹८८८ कोटींचा तोटा, ठाण्यात ६८० प्रकरणांत ₹१७४ कोटींचे नुकसान, तर नागपूरमध्ये २१२ प्रकरणांत ₹६३ कोटींचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. यावरून पुण्यातील सायबर गुन्ह्यांचे प्रमाण आणि त्याचा आर्थिक परिणाम किती मोठा आहे हे स्पष्ट होते.

पुणेकरांच्या आर्थिक नुकसानीचे प्रमुख कारण – ₹५,५४१ कोटींचा GST घोटाळा!

पुणे सायबर व आर्थिक गुन्हे विभागाचे उपायुक्त विवेक मसाल यांनी सांगितले की, पुण्यातील मोठ्या आर्थिक नुकसानीमागे दोन मोठे GST फसवणुकीचे प्रकरण जबाबदार आहेत. यामुळे एकाच वेळी हजारो कोटींचा फटका बसला आहे.

सायबर गुन्ह्यांविरोधात पुणे पोलिसांचा मोठा प्लॅन!

✅ नवीन सायबर पोलिस ठाणे उभारणार – पूर्व आणि पश्चिम विभागासाठी वेगवेगळी ठाणी
✅ सायबर गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणार – नवीन ACP आणि ६ नवीन DCP पदांची मागणी
✅ २६ अत्याधुनिक सायबर लॅब्स तयार करणार, पुण्यातील लॅब महिनाभरात कार्यरत होणार
✅ शाळा, महाविद्यालये, खासगी कंपन्यांमध्ये जनजागृती मोहीम राबवणार
✅ सायबर गुन्हे शोधण्यासाठी खासगी तज्ज्ञांची मदत घेणार

बँक कर्मचारीच सायबर गुन्ह्यांना मदत करत असल्याचा संशय!

सायबर तज्ज्ञ विशाल ओव्हाळ यांनी मोठा गौप्यस्फोट करत सांगितले की, काही बँक कर्मचारीच तृतीय पक्षांना ग्राहकांची माहिती पुरवत असावेत. अनेक बँका ग्राहकांची KYC अद्ययावत करत नाहीत, त्यामुळे व्यवहार शोधण्यास अडचण येते.

यासंदर्भात उपाययोजना सुचवताना विवेक मसाल यांनी सांगितले की,
“बँकांनी प्रत्येक खातेदाराची पूर्ण KYC अपडेट करावी. फक्त नाव, स्वाक्षरी आणि फोटो एवढे पुरेसे नाही. तसेच, वयोवृद्ध व्यक्तींनी मोठी रक्कम काढण्यास अर्ज केल्यास, त्यांना दुसऱ्या क्रमांकावरून खातरजमा करून मगच व्यवहारास परवानगी द्यावी.”

गुन्हेगारांना रोखण्यासाठी सायबर पोलिसांची नवीन रणनीती!

🔹 सायबर गस्त वाढवली जाणार, बोगस वेबसाइट्स आणि फसवणुकीच्या लिंकवर विशेष लक्ष
🔹 सॉफ्टवेअरच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांचे लोकेशन ट्रॅक करण्यावर भर
🔹 सायबर तक्रारींसाठी स्वतंत्र हेल्पलाइन आणि तक्रार निवारण केंद्र उभारणार
🔹 बँकांशी समन्वय वाढवून संशयित व्यवहारांवर वेळीच नियंत्रण मिळवणार

गृहमंत्रालयाकडून प्रस्तावाला लवकरच मंजुरीची शक्यता!

पुणे पोलिस आयुक्तालयाने राज्य सरकारकडे नवीन ACP आणि ६ नवीन DCP पदांसह नवीन सायबर पोलिस ठाण्यांची मागणी केली आहे. गृहविभागाने या प्रस्तावाची चाचपणी सुरू केली असून, लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. एकदा हा प्रस्ताव मंजूर झाल्यास सायबर गुन्ह्यांविरोधातील लढाई आणखी प्रभावी होईल आणि पुणेकरांना दिलासा मिळेल.

सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, पोलिसांनी घेतलेली ही पुढाकारात्मक पावले पुण्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत.