Home Breaking News थोर महिलांच्या विचारांचा जागर! चिमुकल्या विद्यार्थिनींनी साकारल्या कर्तृत्ववान महिलांच्या भूमिका, अनोख्या उपक्रमाने...

थोर महिलांच्या विचारांचा जागर! चिमुकल्या विद्यार्थिनींनी साकारल्या कर्तृत्ववान महिलांच्या भूमिका, अनोख्या उपक्रमाने महिला दिन साजरा

पुणे, ८ मार्च: महिलांच्या योगदानाचा गौरव करणारा आंतरराष्ट्रीय महिला दिन जगभरात उत्साहात साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर साईनाथ मंडळ ट्रस्ट व नवीन मराठी शाळेच्या वतीने अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनींनी भारताच्या थोर कर्तृत्ववान महिलांची वेशभूषा करून, त्यांच्या विचारांवर भाष्य करत प्रभावी वकृत्व सादर केले. या अनोख्या उपक्रमाने महिला सशक्तीकरणाचा संदेश देत उपस्थितांची मने जिंकली.

प्रेरणादायी उपक्रम, ऐतिहासिक महिलांना साकारण्याची संधी!

या स्पर्धेत विद्यार्थिनींनी राजमाता जिजाबाई, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, डॉक्टर आनंदीबाई जोशी, प्रतिभाताई पाटील, बहिणाबाई चौधरी, संतोष यादव, सिंधुताई सपकाळ, सुधा मूर्ती, मादाम कामा, महाराणी ताराबाई, रमाबाई रानडे, संत मीराबाई, मनू भाकर, कॅप्टन लक्ष्मी सहगल, सरोजिनी नायडू अशा थोर महिलांचे जीवन साकारले. त्यांचे पराक्रम, संघर्ष आणि विचार सादर करत असताना उपस्थित प्रेक्षक भारावून गेले.

विद्यार्थिनींनी वेशभूषेसह ओघवत्या भाषणांनी उपस्थितांना केले मंत्रमुग्ध!

या स्पर्धेत २३ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. त्यांनी वेशभूषेच्या माध्यमातून केवळ त्या महिलांचा पोशाखच साकारला नाही तर त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग, कार्य आणि विचार प्रभावीपणे मांडले. त्यांच्या वकृत्वाने संपूर्ण सभागृह दुमदुमून गेले आणि उपस्थित शिक्षक, पालक व पाहुणे स्तिमित झाले.

स्पर्धेतील विजेत्यांना गौरव, सन्मानपत्र व पारितोषिक प्रदान!

या स्पर्धेत पहिल्या पाच विजेत्यांना तसेच उत्तेजनार्थ पुरस्कार विजेत्यांना सन्मानपत्र, शालेय साहित्य व पुस्तके देऊन गौरवण्यात आले. प्रमुख पाहुण्या डॉ. अनन्या बिबवे, सुवर्णा बोडस, मुख्याध्यापिका सौ. कल्पना वाघमारे आणि साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पीयूष शाह यांच्या हस्ते विद्यार्थिनींना बक्षीसे प्रदान करण्यात आली.

महिला सशक्तीकरणाचा संदेश, नवीन मराठी शाळेचा स्तुत्य उपक्रम!

या कार्यक्रमाचे आयोजन साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पीयूष शाह आणि नवीन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कल्पना वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थिनींना महिलांच्या योगदानाची जाणीव होण्याबरोबरच, त्यांच्या विचारांचा प्रसार करण्याची संधी मिळाली.

🟢 हा उपक्रम विद्यार्थिनींसाठी केवळ स्पर्धा नसून प्रेरणादायी शिकवण देणारा सुवर्णयोग ठरला.
🟢 भारतीय समाजाला घडवणाऱ्या महिला आदर्शांच्या विचारांचा जागर घडवणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
🟢 महिला दिनानिमित्त समाजात महिला सशक्तीकरणाचा व त्यांच्या योगदानाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्याचे कार्य नवीन मराठी शाळेच्या विद्यार्थिनींनी लक्षणीय पद्धतीने केले आहे.