राज्यातील बालकांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी राज्य सरकारने राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत विशेष तपासणी मोहीमेचा शुभारंभ केला आहे. उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते औंध येथील इंदिरा गांधी मॉडेल स्कूलमध्ये या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
या वेळी मंचावर सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, शहरी आरोग्य सेवा संचालक डॉ. स्वप्नील लाळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
बालकांच्या निरोगी भविष्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वेळी बोलताना सांगितले की, राज्य शासन प्रत्येक बालकाच्या आरोग्याची जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडेल. या मोहीमेच्या माध्यमातून ० ते १८ वयोगटातील लाखो बालकांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यामध्ये ६ हजार शाळांमधील १४ लाख विद्यार्थी आणि ३० हजार अंगणवाड्यांमधील २० लाख बालकांचा समावेश असेल.
या आरोग्य चाचणीमध्ये कोणकोणते तपास होणार?
✅ शारीरिक आणि मानसिक आरोग्य तपासणी ✅ डोळे, कान, दात आणि त्वचेचे आजार ✅ हृदयविकार, कुष्ठरोग, थायरॉईड आदी रोगांचे निदान ✅ ॲनेमिया आणि कुपोषणावर उपचार ✅ गंभीर आजारांसाठी मोफत उपचार आणि शस्त्रक्रिया
बालकांचे आरोग्य प्रथम – तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश
बालकांच्या आरोग्यासाठी ही तपासणी अत्यंत महत्त्वाची असून, निदान झालेल्या गंभीर आजारांवर शासकीय तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत मोफत उपचार दिले जाणार आहेत. या मोहिमेसाठी राज्यभरातील तज्ज्ञ डॉक्टरांचे सहकार्य घेतले जात आहे.
महिला आरोग्याविषयी महत्त्वाचा निर्णय येणार!
महिलांमध्ये वाढत्या कर्करोगाच्या प्रमाणावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लस उपलब्ध करून देण्याबाबतही सरकार विचार करत आहे. याबाबत लवकरच महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय बाल आरोग्य मोहीम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, पालक आणि आरोग्य यंत्रणांनी एकत्र यावे – मंत्री दादाजी भुसे
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे कोणताही विद्यार्थी उपचारापासून वंचित राहू नये, यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाने एकत्र येऊन ही मोहीम यशस्वी करावी.
सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी सरकार कटिबद्ध – मंत्री प्रकाश आबिटकर
सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, सरकारच्या १०० दिवसांच्या विशेष उपक्रमांतर्गत राज्यातील दोन कोटी बालकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. तसेच, ग्रामीण भागातही प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि जिल्हा रुग्णालयांचा विकास करण्यात येणार आहे.
बालकांचे आरोग्य चांगले असेल तरच देशाचे भविष्य उज्ज्वल राहील!
राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज्यभरातील शिक्षक, पालक, मुख्याध्यापक आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन करण्यात आले.