Home Breaking News मुंबईत आगीचा धुमाकूळ : लोहार चाळ, मरीन लाइन्स आणि विलेपार्ले येथील इमारतींना...

मुंबईत आगीचा धुमाकूळ : लोहार चाळ, मरीन लाइन्स आणि विलेपार्ले येथील इमारतींना आग, अनेकांची सुटका

मुंबई शहरात शनिवारी वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या आगीच्या घटनांनी खळबळ उडवली. लोहार चाळ, मरीन लाइन्स आणि विलेपार्ले येथील इमारतींना लागलेल्या आगीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली, मात्र आगीच्या घटनांमुळे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.

विलेपार्लेतील हॉटेल फेअरमाँटच्या रूफटॉपला भीषण आग

विलेपार्ले (पूर्व) येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ असलेल्या हॉटेल फेअरमाँटच्या रूफटॉप रेस्टॉरंटमध्ये शनिवारी संध्याकाळी सुमारे ५.३० वाजता अचानक आग लागली. या घटनेमुळे परिसरात मोठी धावपळ उडाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र आगीमुळे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जवळपास ७०-८० लोकांना सीढ्यांमधून सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. आगीमुळे एसी युनिट आणि एक्झॉस्ट डक्टिंग जळून खाक झाले. ही आग सुमारे १,००० ते १,५०० चौरस फुटांच्या क्षेत्रात पसरली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तीन अग्निशमन बंब, तीन पाण्याचे टँकर आणि अन्य मदतीसाठी पथके तैनात करण्यात आली होती. सुमारे दीड तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग नियंत्रणात आणली. आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मरीन लाइन्समधील इमारतीला आग : वेळेत बचावकार्यता, मोठा अनर्थ टळला

मुंबईच्या मरीन लाइन्स भागातील ‘मरीन चेंबर्स’ या पाच मजली निवासी इमारतीत दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग पाचव्या मजल्यावरील एका २००० चौरस फुटाच्या फ्लॅटमध्ये लागल्याने तेथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

या आगीत इलेक्ट्रिक वायरिंग, लाकडी फर्निचर, फॉल्स सिलिंग, गॅस पुरवठा ट्यूब, रेग्युलेटर यासह घरगुती साहित्य जळून खाक झाले. तसेच मॅट्रेस व इतर वस्तूही जळाल्याचे समजते. अग्निशमन दलाने तत्काळ कारवाई करत दोन तासांत ही आग आटोक्यात आणली. विशेष म्हणजे, इमारतीच्या वरच्या मजल्यावर अडकलेल्या रहिवाशांची सुखरूप सुटका करण्यात यश आले.

मुंबईत आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ : नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मुंबईत मागील काही दिवसांपासून आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शॉर्ट सर्किट, गॅस गळती आणि अनधिकृत विद्युत जोडण्या यामुळे अनेक ठिकाणी आगी लागण्याच्या घटना घडत आहेत. अग्निशमन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, सुरक्षिततेच्या उपाययोजना योग्य प्रकारे पाळण्याचे निर्देश दिले आहेत.