पिंपरी-चिंचवड : एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाधववाडी मोशी येथे एका अनोळखी महिलेचा थरारक खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी निर्घृणपणे महिलेचा खून करून तिचा मृतदेह पोत्यात भरून जाधववाडी, मोशी येथील मातेरे हाऊस चौकाजवळ निर्जन स्थळी फेकून दिला. शुक्रवारी (दि. २१) रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार समोर आला असून, या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मृतदेह ओळख पटू नये म्हणून पोत्यात भरला?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधववाडी मोशी येथील एका कॉम्प्लेक्सच्या मागच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत हा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे महिलेची ओळख पटू नये म्हणून तिला पिवळ्या रंगाच्या पोत्यात भरून फेकण्यात आले होते. पोलिसांनी प्राथमिक तपासात या महिलेचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
हत्या कुणी आणि का केली?
या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी भोसरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस अंमलदार शंकर रोकडे यांनी फिर्याद दाखल केली असून, अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या महिलेची हत्या नेमकी कुणी आणि का केली, याचा तपास पोलीस करत आहेत.
परिसरात दहशतीचे वातावरण
या घटनेनंतर जाधववाडी आणि मोशी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. निर्जन ठिकाणी अशा प्रकारे मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या महिलेची ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, तिचा कोणाशी संपर्क होता, याचीही चौकशी सुरू आहे.
पोलिसांकडून नागरिकांना सहकार्याची विनंती
या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना कोणतीही महत्त्वाची माहिती असल्यास ती लगेच देण्याचे आवाहन केले आहे. “जर कोणाला संशयास्पद हालचाली दिसल्या असतील किंवा या महिलेबाबत काही माहिती असेल, तर त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा,” असे आवाहन एमआयडीसी भोसरी पोलिसांनी केले आहे.
या प्रकरणातील आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, ही हत्या पूर्वनियोजित कटाचा भाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.