Home Breaking News वानवडी पोलिसांची मोठी कारवाई! १० लाख रुपये किंमतीचे प्रतिबंधित मांडुळ जप्त, दोन...

वानवडी पोलिसांची मोठी कारवाई! १० लाख रुपये किंमतीचे प्रतिबंधित मांडुळ जप्त, दोन आरोपी जेरबंद

55
0

पुणे शहरातील वानवडी पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई करत वन्यजीव प्राणी संरक्षण कायद्यानुसार प्रतिबंधित असलेल्या मांडुळ जातीच्या सापांची अवैध विक्री करणाऱ्या दोन इसमांना अटक केली आहे. या कारवाईत १० लाख रुपये किंमतीचा रेडसन जातीचा मांडुळ जप्त करण्यात आला असून, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वानवडी पोलिसांची गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई

वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ फेब्रुवारी २०२५ रोजी कोम्बिंग ऑपरेशन आणि अवैध धंद्यांविरोधातील मोहीम राबवली जात होती. यावेळी पोलीस अंमलदार संदिप साळवे आणि सर्फराज देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोन इसम साईबाबा मंदिर चौक, जगताप चौक, वानवडी येथे प्रतिबंधित मांडुळ विक्रीसाठी येणार आहेत.

त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पंच आणि पोलिसांचे पथक सापळा रचून जागेवर तैनात करण्यात आले. १५ फेब्रुवारीच्या मध्यरात्री १२.५० वाजण्याच्या सुमारास संशयित इसम घटनास्थळी आल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यातील एकाच्या हातात लाल आणि काळ्या रंगाची बॅग असल्याने त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे प्रतिबंधित रेडसन जातीचा मांडुळ असल्याचे स्पष्ट झाले.

अटक आरोपींची ओळख पटली, वन्यजीव कायद्याखाली गुन्हा दाखल

पोलिसांनी तात्काळ दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता, १) महंमद कामराण अब्दुल करीम (वय ३०, रा. गुलबर्गा, हागरगा क्रॉस, झमझम कॉलनी, कर्नाटक) आणि २) मिथुन शेट्टीबा मंजुळे (वय ३०, रा. विद्यानगर, ता. निलंगा, जि. लातूर) अशी त्यांची ओळख पटली.

चौकशीअंती मांडुळ जातीचा हा सरपटणारा वन्यजीव प्राणी ‘वन्यजीव संरक्षण कायदा १९७२’ च्या अनुसूची-३ मध्ये समाविष्ट असून त्याची विक्री आणि वाहतूक बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम २(१६), ९, ४४(१)(सी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

मांडुळाची तस्करी : अंधश्रद्धेचा बाजार!

भारतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मांडुळ जातीच्या सापांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. विशेषतः तस्करांनी या सापांचा उपयोग काळ्या जादू, औषधनिर्मिती, चमत्कारी उपाय आणि श्रीमंती आकर्षित करण्यासाठी केल्याचे अनेकदा समोर आले आहे. मांडुळ हा अत्यंत दुर्मिळ आणि संरक्षित प्राणी असल्याने त्याची तस्करी ही गंभीर गुन्हा मानली जाते.

वन्यजीव विभागाच्या ताब्यात मांडुळ, पुढील चौकशी सुरू

पोलिसांनी जप्त केलेला १० लाख रुपये किमतीचा मांडुळ ‘मा. संचालक, वन्यजीव संग्रहालय, बावधान, पुणे’ यांच्याकडे संरक्षणार्थ सोपवला आहे. आरोपींच्या अधिक चौकशीत त्यांचा मोठ्या तस्करी रॅकेटशी संबंध असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलिसांचे उत्कृष्ट काम : वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सत्यजित आदमने, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. गोविंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे, पोलीस अंमलदार रमेश साबळे, सर्फराज देशमुख, संदिप साळवे, सोमनाथ कांबळे, गोपाळ मदने, अमोल गायकवाड, विष्णु सुतार यांच्या पथकाने केली.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन : तस्करीविरोधात माहिती द्या!

वानवडी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही प्रकारच्या वन्यजीव तस्करी, अवैध व्यापार किंवा संशयास्पद व्यक्तींविषयी माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांना कळवा.