Home Breaking News पुण्यात बनावट इंजिन ऑइल विक्रीचा पर्दाफाश! गुन्हे शाखेची मोठी कारवाई, लाखोंचा मुद्देमाल...

पुण्यात बनावट इंजिन ऑइल विक्रीचा पर्दाफाश! गुन्हे शाखेची मोठी कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त

115
0
📍 पुणे – पुणे शहरात नामांकित HERO कंपनीच्या लुब्रिकंट ऑइलचे बनावट उत्पादन आणि विक्री प्रकरण उघडकीस आले असून, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तात्काळ कारवाई करत मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल ३,११,४१५/- रुपयांचा बनावट माल जप्त करण्यात आला आहे.
HERO कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधीकडून तक्रार दाखल
HERO कंपनीचे अधिकृत प्रतिनिधी श्री. सचिन शर्मा (रा. फरीदाबाद, हरियाणा) यांना पुणे शहर आणि परिसरात HERO कंपनीच्या H Herro या नावाने बनावट लुब्रिकंट ऑइलची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने पुणे शहर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) यांच्या आदेशाने गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने तपास सुरू केला आणि कारवाईचे नियोजन केले.
हडपसरमधील दुकानावर धडक छापा – पहिला आरोपी जेरबंद!
पोलिसांनी युनीक ऑटोमोबाईल्स अँड स्पेअर पार्ट्स, हडपसर येथे छापा टाकला.
तिथून ताहेर बुर्‍हानुद्दीन पुनावाला (वय २०, रा. कोंढवा) याला ताब्यात घेण्यात आले.
त्याच्या दुकानातून ‘H Herro’ नावाने बनावट ब्रँडचे ३०६ नग इंजिन ऑइलच्या बाटल्या (किंमत – ₹१,१०,१६०/-) जप्त करण्यात आल्या.
वाघोलीतील कारखान्यावर छापा – मास्टरमाइंड आरोपी पकडला!
तपासादरम्यान, ताहेर पुनावालाने हा बनावट माल वाघोली येथून घेतल्याचे उघड झाले.
पोलिसांनी वाघोलीतील एस.एफ. इंडस्ट्रीयल कार्पोरेशन या बनावट उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकली.
तेथून जावेद शेरजमा खान (रा. टिंगरेनगर, पुणे) याला अटक करण्यात आली.
त्याच्या ताब्यातून तब्बल ₹२,०१,२५५/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बनावट ऑइलसह मोठ्या प्रमाणात साहित्य जप्त
📌 ४७२ बनावट इंजिन ऑइलच्या बाटल्या (९०० मिली)
📌 ५६० बनावट लोगो
📌 १,२७५ रिकाम्या बाटल्या
📌 १०० पॅकिंग बॉक्स
या संपूर्ण कारवाईत एकूण ₹३,११,४१५/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बनावट ऑइलमुळे वाहनधारकांचे मोठे नुकसान!
बनावट लुब्रिकंट ऑइलमुळे वाहनांची कार्यक्षमता कमी होते, इंजिनला धोका निर्माण होतो आणि ग्राहकांची फसवणूक होते.
HERO कंपनीच्या अधिकृत ब्रँडला बनावट उत्पादनांमुळे मोठे नुकसान होत होते. पोलिसांच्या वेळीच केलेल्या कारवाईमुळे मोठा गैरव्यवहार रोखण्यात आला आहे.
पोलीस तपास सुरू – आणखी धागेदोरे मिळण्याची शक्यता!
गुन्हे शाखेने काळेपडळ पोलीस ठाण्यात कॉपीराइट अॅक्ट १९५७ चे कलम ५१, ६३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
🔍 पुढील तपास सुरू असून, या रॅकेटमध्ये आणखी आरोपी सामील असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलीस दलाच्या सतर्कतेमुळे मोठा गैरव्यवहार रोखला
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त श्री. निखिल पिंगळे, पोलीस उप आयुक्त (आर्थिक व सायबर गुन्हे) श्री. विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे श्री. गणेश इंगळे आणि श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
📌 युनिट ५ गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. युवराज हांडे, सपोनि. मदन कांबळे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली.
🚔 पुणे पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे पुणे शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बनावट ऑइल विक्रीच्या रॅकेटवर आळा घालण्यात आला आहे.