Home Breaking News विद्यार्थ्यांसाठी अनोखा ‘Pune Traffic Mitigation Internship Program’; वाहतूक व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि...

विद्यार्थ्यांसाठी अनोखा ‘Pune Traffic Mitigation Internship Program’; वाहतूक व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिके

81
0
पुणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेतील आव्हाने आणि समस्यांची प्रत्यक्ष माहिती मिळावी, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वाहतूक नियमन व आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने होणाऱ्या सुधारणा समजाव्यात, यासाठी पुणे वाहतूक पोलीस विभाग, पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोलॅबोरेटिव्ह रिस्पॉन्स (PPCR), टॉप मॅनेजमेंट कन्सोर्टियम फाऊंडेशन (TMCF) आणि जहांगीर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने “Pune Traffic Mitigation Internship Program” हा विशेष उपक्रम राबविण्यात आला आहे.
मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमास मा. श्री. मनोज पाटील (अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर), डॉ. सुधीर मेहता (पिनॅकल इंडस्ट्री अँड इकोमोबिलीटी), श्री. मुकेश मल्होत्रा (ओनर ऑफ विकफिल्ड कंपनी), श्री. अजय अगरवाल (माय पेज पुणे) आणि श्री. निशित कामत (ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम स्ट्रॅटेजिस्ट आणि डिझायनर, पुणे ट्रॅफिक मिटीगेशन इनिशिएटिव्ह) आदी मान्यवर उपस्थित होते.
वाहतूक व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान यांचा प्रत्यक्ष अनुभव
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना पुणे शहरातील वाहतूक शाखेचे नियोजन, प्रशासन, सीसीटीव्ही मॉनिटरींग, मल्टीमिडीया कंट्रोल, संगणकीय प्रणाली आणि ई-चालान प्रणाली यांची सखोल माहिती देण्यात आली. तसेच, शहरातील वाहतूक सुधारणा आणि नियमन यामध्ये गुगल मॅप्स, सीसीटीव्ही मॉनिटरींग, एटीएमएस (Adaptive Traffic Management System) यांसारख्या तांत्रिक घटकांचा उपयोग कसा केला जातो, हे समजावून सांगण्यात आले.
विशेष म्हणजे सिंहगड रोड येथील ATMS संस्थेला भेट देऊन, वाहतुकीच्या व्यवस्थापनात तंत्रज्ञानाचा कसा उपयोग होतो, प्रवासाच्या वेळेतील अचूकता कशी सुधारता येते, तसेच रिअल-टाईम ट्राफिक मॉनिटरींग आणि इंटेलिजंट ट्राफिक सिस्टीमच्या साहाय्याने अपघात टाळण्याच्या उपाययोजना याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिके आणि वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई
शहरातील वर्दळीच्या आणि वाहतूक नियमनासाठी आव्हानात्मक असलेल्या चौकांमध्ये विद्यार्थ्यांना नेण्यात आले. तिथे फॅन्सी नंबर प्लेट्स, भरधाव वेगाने वाहन चालवणे, ट्रिपल सीट प्रवास, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे यासारख्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
विद्यार्थ्यांना सीसीटीव्ही मॉनिटरींग, ई-चालान प्रणाली, टोईंग मशीन, स्पीडगन मशीन (इंटरसेप्टर वाहन) यांची माहिती देण्यात आली. तसेच, वाहतूक नियमांचे पालन न केल्याने होणाऱ्या अपघातांचे गंभीर परिणाम स्पष्ट करून वाहनचालकांमध्ये शिस्त आणि सुरक्षिततेच्या जाणीवेची गरज अधोरेखित करण्यात आली.
वाहतूक व्यवस्थापनात तरुणाईचा सहभाग महत्त्वाचा
हा उपक्रम केवळ वाहतूक नियमांची माहिती देण्यासाठी नसून, तरुण पिढीला शहराच्या वाहतूक व्यवस्थापनातील धोरणे, आव्हाने आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने होणारे बदल समजून घेण्यासाठी प्रेरित करणारा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांनी वाहतूक व्यवस्थापनाच्या यंत्रणेतील तांत्रिक आणि प्रशासकीय बाजू जवळून पाहिल्या, तसेच प्रत्यक्ष अनुभवातून वाहतुकीचे नियमन कसे केले जाते, हे शिकले.
नागरिक आणि विद्यार्थ्यांकडून कौतुकाची थाप
पुणे शहरातील नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत केले आहे. वाहतूक नियम पाळल्यास शहरातील वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते, याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण झाली आहे. पुणे वाहतूक पोलीस विभागाच्या या उपक्रमामुळे “सुरक्षित आणि शिस्तबद्ध वाहतूक” या संकल्पनेला नवी दिशा मिळाली आहे.