Home Breaking News सैफवर हल्ल्यानंतर कुटुंबाची मोठी दहशत; तैमूर-जेहच्या नॅनीची काळजी, करीनाचे पोलिसांना निवेदन

सैफवर हल्ल्यानंतर कुटुंबाची मोठी दहशत; तैमूर-जेहच्या नॅनीची काळजी, करीनाचे पोलिसांना निवेदन

अभिनेता सैफ अली खान याच्यावर 15 जानेवारीच्या मध्यरात्री वांद्रे येथील घरी घडलेल्या हल्ल्याने त्याचे कुटुंबीय हादरले आहेत. या घटनेमुळे केवळ सैफ-करीना नव्हे, तर त्यांच्या दोन मुलं तैमूर आणि जेह यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हल्लेखोराने आधी जेहच्या खोलीत लपून राहिल्याचा संशय असून, त्यामुळेच त्यांच्या माजी नॅनी ललिता डिसिल्वा यांच्यावरही प्रचंड मानसिक ताण आला आहे.
कुटुंबाच्या सुरक्षिततेवर सावट
सैफवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीने घरात कसा प्रवेश केला, याबाबत अद्यापही अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत. हल्लेखोराने आधी लपून राहून नंतर अचानक हल्ला चढवल्याने, संपूर्ण कुटुंब धास्तावले आहे. सैफच्या घरातील कर्मचारी वर्गाचा जबाब नोंदवला गेला असून, लवकरच करीना कपूर हिचा जबाबही नोंदवला जाईल. करीनाला हल्लेखोराशी थेट सामना करावा लागला असल्याने तिची माहिती पोलिसांसाठी महत्वाची ठरणार आहे.
सैफवर शस्त्रक्रिया, प्रकृती स्थिर
या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर तातडीने लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या सैफची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे, मात्र त्याला मानसिक धक्का बसला असून कुटुंबाला अजूनही या घटनेतून सावरण्यासाठी वेळ लागत आहे.
तैमूर-जेहच्या माजी नॅनीची प्रतिक्रिया
तैमूर आणि जेह यांची माजी नॅनी ललिता डिसिल्वा या घटनेमुळे खूपच व्यथित झाल्या आहेत. “जेह इतका लहान आहे, त्याच्या खोलीतच आरोपी लपून बसला होता हे ऐकून मी हादरले आहे. सैफ-करीना आणि मुलं खूप घाबरली असतील. आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. सैफ-करीनाशी माझं बोलणं झालेलं नाही, पण मला खात्री आहे की ते सुरक्षित असतील,” असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं.
करिनाचं माध्यमांसाठी निवेदन
सैफवर हल्ल्यानंतर करीना कपूरने प्रसारमाध्यमांसाठी अधिकृत निवेदन जारी करत, “हा आमच्या कुटुंबासाठी अतिशय धक्कादायक आणि आव्हानात्मक प्रसंग आहे. कृपया घडलेल्या घटनेबाबत अटकळ बांधू नका. आम्हाला वेळ आणि स्पेस द्या,” अशी विनंती केली.
हल्ल्यामुळे वांद्रे परिसरातील सुरक्षा ऐरणीवर
या हल्ल्यामुळे वांद्रे परिसरात राहणाऱ्या सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्थानिक नागरिकांनी अधिक पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे.