Home Breaking News पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकारी कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थींना...

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकारी कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थींना आज मार्गदर्शन

पिंपरी, दि. १६ जानेवारी २०२५ : आगीसारखी आपत्ती उद्भवल्यास त्यावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी कोणत्या प्रकारच्या  उपाययोजना प्राधान्याने कराव्यात यासंबंधी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकारी कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थींना आज मार्गदर्शन करण्यात आले.
          चिंचवड येथील विज्ञान केंद्र येथे स्थानिक प्राधिकरण परिषदेच्या सिंगापूर येथील प्रतिनिधी कार्यालयाच्या सहकार्याने अग्निशमन व आपत्ती प्रतिबंधक प्रशिक्षण सुरु आहे. या प्रशिक्षणाच्या  चौथ्या दिवशी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत आगीसारखी आपत्ती उद्भवल्यास त्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यासंदर्भात अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकारी कर्मचारी प्रशिक्षणार्थी वर्गाला मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी औंध कॅम्पच्या ३३० इन्फट्री ब्रिगेडचे कर्नल नितीन रुमाले,  उपआयुक्त मनोज लोणकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे, टाटा मोटर्स कंपनीचे उप अग्निशमन अधिकारी घनशाम कांचन, सुरजीत चौहान, भारतीय सैन्य दलातील युनिट  २४ मराठा  रेझीमेंट येथील सुभेदार विजय गायकवाड, युनिट ८ महार रेझीमेंटचे नायब सुभेदार नागेन्दर द्विवेदी, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे अधिकारी कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थी आदी उपस्थित होते.
          आग लागल्यास करावयाच्या उपाययोजना, आग प्रतिबंधक उपकरणांची माहिती, सुरक्षितता नियम, आग प्रतिबंध व सुरक्षा याबाबत जपानच्या जे.क्लेर” संस्थेचे विशेषज्ञ शिआमि यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती सांगितली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात आग लागल्यास  नागरिकांनी घ्यावयाची काळजी, याबाबत करावयाच्या प्रभावी उपाययोजना, उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासंदर्भात काय काळजी घ्यावी हे देखील त्यांनी सांगितले. आगी सारख्या आपत्ती काळात आग आटोक्यात आणणे, जीवित व वित्त हानी टाळण्यासाठी कोणत्या प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, आग आटोक्यात आणण्यासाठी आधुनिक उपकरणांचा वापर करून त्वरित घटनास्थळी पोहोचणे, आग लागलेल्या घटनास्थळी अडकलेल्या नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी बचाव कार्य करून कोणत्याही परिस्थितीत त्वरित निर्णय घेऊन जीव वाचवण्यावर लक्ष केंद्रित करणे आदीबाबत माहिती सांगितली. तसेच प्रत्येक घरात संवेदनशील सर्किट ब्रेकर, आग प्रतिबंधक उपकरण, धूर सूचक यंत्रणा बसवावे तसेच आपत्तीच्या काळात अग्निशमन विभागाने पोलीस प्रशासन, वैद्यकीय अधिकारी तसेच नागरिकांशी योग्य समन्वय साधून बचावकार्य केल्यास आपत्तीवर जलदगतीने नियंत्रण मिळविता येईल असे देखील शिआमी यांनी सांगितले.
          दरम्यान, आगी सारख्या आपत्तीमध्ये बचावकार्य कसे करावे याबाबत विविध प्रात्यक्षिके घेण्यात आली.