नवी मुंबईतील तळोजा भागात एका भरधाव कारने रस्त्यावर चालणाऱ्या पादचाऱ्यांना जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून, ४४ वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात आज सकाळी १० वाजताच्या सुमारास घडला असून घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे.
मृत व्यक्तीचे नाव लालू दास (वय २७) असून, जखमी महिलेचे नाव प्रमिला दाश (वय ४४) असे आहे. तळोजा परिसरातील मुख्य रस्त्यावरून हे दोघेही चालत असताना, भरधाव टाटा नेक्सन कारने त्यांना चिरडले.
अपघाताचा घटनाक्रम:
अपघातात लालू दास यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रमिला दाश गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांनी कारचालकाविरोधात संताप व्यक्त केला आहे.
पोलिसांचा तपास सुरू:
तळोजा पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून, अपघातास कारणीभूत असलेल्या कारचालकाचा शोध सुरू आहे. अपघाताच्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेजचा तपास केला जात असून, आरोपी कारचालकाला लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
सावधगिरीची गरज:
या घटनेने रस्ते सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे. भरधाव वाहनांमुळे होणाऱ्या दुर्घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी कडक कारवाईची मागणी नागरिक करत आहेत.





