Home Breaking News TORRES कंपनीत महाघोटाळा आणि रात्रीतून लूट; CEO तौसीफ रियाझ आणि मुख्य विश्लेषक...

TORRES कंपनीत महाघोटाळा आणि रात्रीतून लूट; CEO तौसीफ रियाझ आणि मुख्य विश्लेषक अभिषेक गुप्ता अटकेत!

79
0
मुंबई : (Torres Company Fraud) मुंबईतील प्रसिद्ध टोरेस कंपनीने गुंतवणूकदारांच्या करोडो रुपयांना गंडा घालत फसवणुकीचा नवा विक्रम नोंदवला आहे. कंपनीचे CEO तौसीफ रियाझ आणि मुख्य विश्लेषक अभिषेक गुप्ता यांनी गुंतवणूकदारांना मोठमोठी आमिषं दाखवून त्यांच्या आयुष्यभराची जमापुंजी लुटली आणि पसार झाले.
टोरेस कंपनीने गुंतवणूकदारांना ५०० कोटींचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वर्षभरापूर्वी स्थापन झालेल्या या कंपनीने गुंतवणुकीवर दर आठवड्याला १० टक्के परतावा देण्याचे गोड आश्वासन देत हजारो लोकांना जाळ्यात ओढले. कंपनीने दादर, कांदिवली, नवी मुंबई, कल्याण येथे शाखा उघडून आपला विस्तार केला होता. मात्र अचानक सर्व शाखा बंद करून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पलायन केले.
गुंतवणूकदारांच्या भावनांशी खेळ:
टोरेस कंपनीने आपल्या योजनेतून सामान्य नागरिकांना लाखोंची गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. १० हजार गुंतवल्यास हिरा, ५० हजार गुंतवल्यास गाडीचे कूपन, तर १ लाख गुंतवल्यास घराचे कूपन देण्याचे प्रलोभन दाखवले. लकी ड्रॉ पद्धतीने बक्षिसे जाहीर करण्याचे नाटक करून लोकांचा विश्वास संपादन केला. काही सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना पैसे परत मिळाले, ज्यामुळे अधिक लोक फसले.
फसवणूक झाल्याचे कसे उघड झाले?
गेल्या आठवड्यापासून गुंतवणूकदारांना पैसे मिळणे थांबले. सोमवारी काही गुंतवणूकदारांनी चौकशीसाठी कंपनीच्या कार्यालयात धाव घेतली, मात्र सर्व कार्यालये बंद असल्याचे दिसले. शेकडो गुंतवणूकदारांनी कंपनीच्या सानपाडा येथील मुख्य कार्यालयाबाहेर जमून निदर्शने केली आणि संतापाच्या भरात तोडफोड केली.
पोलिसांकडून तपास सुरू:
या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. कंपनीच्या सीईओ आणि मुख्य विश्लेषकासह अनेक अधिकारी सध्या फरार आहेत. पोलिसांनी सांगितले की, फसवणुकीत सामील असलेल्या सर्व आरोपींना लवकरच अटक केली जाईल.
गुंतवणूकदारांचे आवाहन:
फसवणुकीमुळे अनेक गुंतवणूकदार आर्थिक संकटात सापडले असून, त्यांनी सरकारकडे त्वरित कारवाईची मागणी केली आहे. सरकार आणि आर्थिक गुन्हे विभागाने या प्रकारात लक्ष घालून सर्व गुंतवणूकदारांना न्याय मिळवून देण्याचे आवाहन केले जात आहे.