वाघोली: जुन्या भांडणाच्या वादातून वाघोली परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करणारी घटना उघडकीस आली आहे. वाघोली आव्हाळवाडी रस्त्यावरील बाजारतळाजवळ मंगळवारी (ता. 24) दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणावर कोयत्याने हल्ला केला. या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी ओम दादाराव मस्के (वय 19, रा. दुबेनगर, वाघोली) याला अटक केली आहे.
याप्रकरणी फिर्यादी आदित्य दीपक कांबळे (वय 18, रा. वाघोली) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये ओम मस्के याच्यासह यश माणिक शिरसाठ (रा. आव्हाळवाडी), निखील कांबळे (रा. जे.जे. नगर, वाघोली), करण चव्हाण (रा. कटकेवाडी), प्रसाद मस्के, साहील राठोड, प्रथमेश श्रीखंडे व इतर दोघांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आदित्य कांबळे आणि त्याचा मित्र रोहन जाधव हे मंगळवारी दुपारी दुचाकीवरून जात होते. बाजारतळाजवळ पोहोचल्यावर, तीन मोटारसायकलवर आलेल्या आरोपींनी त्यांचा पाठलाग केला. जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी ओम मस्के याने कोयत्याने हल्ला करत आदित्य कांबळे याच्या खांद्यावर वार केले. या हल्ल्यात आदित्य गंभीर जखमी झाला.
या घटनेनंतर आरोपींनी शस्त्रे हवेत फिरवून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शिवीगाळ करून फिर्यादींना जीवे मारण्याची धमकी दिली. वाघोली पोलीस ठाण्यात या प्रकरणी त्वरित गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलीस हवालदार मोराळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.





